|| प्रशांत देशमख

शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह सुश्रुतांचा उल्लेख पशुवैद्यक

शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुश्रुत यांचा उल्लेख चक्क ‘पशुवैद्यक’ असा करून राज्य पाठय़पुस्तक मंडळाने आपला अभ्यास किती कच्चा आहे, याची प्रचीती दिली आहे.

राज्य पाठय़पुस्तक मंडळाने इयत्ता सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आयुर्वेदाबाबत माहिती देताना ही घोडचूक केल्याचे निदर्शनास आल्यावर वर्धा येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम भुतडा यांनी शनिवारी तक्रार दाखल केली. तर पाठय़पुस्तक मंडळाच्या या कृतीविरोधात आयुर्वेद क्षेत्रातून निषेधाचे सूर उमटत आहेत.

सहावीच्या बालभारतीच्या पुस्तकात गुरू शालिहोत्र शिष्य सुश्रुतास पशुवैद्यकीय धडे देत असल्याचा पाठ आहे. त्यात सुश्रुत हा पशुवैद्यकशास्त्राचा गुणी विद्यार्थी होता, असा उल्लेख आहे. अश्वावर शस्त्रक्रियेच्या वेळी दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करताना सुश्रुत सांगतो, चांगल्या पशुवैद्यकाकडे सिंहाची छाती आणि आईचे ममत्व असणे आवश्यक आहे, याबरोबरच सुश्रुताने पशूंच्या शस्त्रक्रियेबाबत लिहिल्याचा उल्लेख या पाठात आहे.

सुश्रुताचा पशुवैद्यक असा उल्लेख करणे ही बाब अत्यंत अवमानकारक असल्याची प्रतिक्रिया आयुर्वेद क्षेत्रातून व्यक्त होत आहे. वस्तुत: सुश्रुत हा एक महान शल्यचिकित्सक होता. प्राचीन आयुर्वेदशास्त्रात त्याचे महत्त्व आणि योगदान अनन्यसाधारण आहे. त्याने शस्त्रक्रियेसाठी शोधलेली उपकरणे काही प्रमाणात फेरबदल करून आजही उपयोगात आणली जातात. मानवी अवयवांवरील शस्त्रक्रियेसाठी त्याचे मार्गदर्शन मोलाचे समजले जाते. युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर उपचार करताना सुश्रुताचे ज्ञान कामी येत असे, असा संदर्भ इतिहासात आहे.

पाठय़ पुस्तकात सश्रुताविषयी चुकीची माहिती असल्याचे निदर्शनास आल्यावर डॉ. भुतडा यांनी पाठय़पुस्तक मंडळाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. राजीव कुमार यांच्याशी संपर्क साधला. पृथ्वीवरील पहिला ‘सर्जन’ म्हणून ओळख असणाऱ्या सुश्रुताचा पशुवैद्यक असा उल्लेख केल्याबद्दल निषेध नोंदवत त्यांनी हा भाग वगळण्याची मागणी त्यांच्याकडे केली. विशेष म्हणजे, ही चुकीची माहिती २०१६पासून विद्यार्थ्यांना दिली जात आहे.

तो भाग त्वरित वगळणार

सहावीच्या पुस्तकातील सुश्रुतांबाबतचा चुकीचा उल्लेख त्वरित वगळणार, अशी माहिती पाठय़पुस्तक मंडळाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. राजीव कुमार यांनी डॉ. भुतडा यांना दिली.