राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. तर, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही सातत्याने अधिक आढळून येत आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) देखील वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून करोना निर्बंध देखील शिथिल करण्यात आलेले आहेत. दरम्यान, मागील २४ तासात राज्यभरात १४ हजार ७३२ रूग्ण करोनातून बरे झाले असून, ८ हजार १२९ नवीन करोनाबाधित आढळून आले. तर, २०० रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या १,४७,३५४ आहे. तर, आजपर्यंत ५६,५४,००३ रूग्ण करोनातून बरे झाले असून, १,१२,६९६ करोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. राज्याचा मृत्यू दर १.९० टक्के आहे. तर, राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५९,१७,१२१ झाली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या ३,८२,१५,४९२ नमुन्यांपैकी ५९,१७,१२१ नमुने (१५.४८ टक्के) करोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. राज्यात सध्या ९,४९,२५१ जण गृहविलगीकरणात आहेत, तर ५ हजार ९९७ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.