राज्यात आज देखील करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. दिवसभरात राज्यात ३ हजार ८२४ नवे करोनाबाधित आढळले, तर ५ हजार ८ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला. याशिवाय, ७० रुग्णांचा करोनामुळे दिवसभरात मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ६८ हजार १७२ वर पोहचली आहे.

मोठी बातमी!… राज्यात शनिवारपासून शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मिळणार मोफत रक्त

याशिवाय, राज्यातील करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९३.५२ टक्क्यांवर पोहचले आहे. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह केसेसची संख्या ७१ हजार ९१० असून, १७ लाख ४७ हजार १९९ जण करोनामुक्त झालेले आहेत. याशिवाय आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४७ हजार ९७२ वर पोहचली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १५ लाख २ हजार ४२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ६८ हजार १७२ (१६.२४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४१ हजार ५९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. ५ हजार १३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यात शनिवार दि. १२ डिसेंबरपासून सर्व शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांना मोफत रक्त मिळणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्तदान करून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहनही केले आहे.

शासकीय रुग्णालयात रक्तावरील प्रकियेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जाते. आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास त्यास मोफत रक्त उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.