राज्यातील करोना संसर्ग आता झपाट्याने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय, मृत्यूंच्या संख्येतही भर सुरूच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आलेला आहे. तर राज्यभरात निर्बंध अधिकच कठोर करण्यात आलेले आहेत. मात्र तरी देखील करोना रूग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. आज(रविवार) दिवसभरात राज्यभरात १६ हजार ६२० करोनाबाधित वाढले असुन, ५० रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.२८ टक्के आहे.  आजपर्यंत राज्यात ५२ हजार ८६१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

दरम्यान, आज ८ हजार ८६१ रुग्ण करोनातून बरे झाले, राज्यात आजपर्यंत एकूण २१,३४,०७२  करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९२.२१ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७५,१६,८८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,१४,४१३ (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८३,७१३ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर ५,४९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२६,२३१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.