राज्यात दिवसभरात ३ हजार ९८० जणांनी करोनावर मात केली, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तर, २ हजार ८८६ नवे करोनाबाधित आढळले असून, ५२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या २० लाख ८७८ वर पोहचली आहे.

सध्या राज्यात ४५ हजार ६२२ अॅक्टिव्ह केसेस असून, १९ लाख ३ हजार ४०८ जण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय, करोनामुळे ५० हजार ६३४ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.

सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९५.१३ टक्के आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४०,१९,१८८ नमुन्यांपैकी २० लाख ८७८ (१४.२७टक्के) नमून पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख १२ हजार २३ जण गृहविलगीकरणात तर, १ हजार ९३६ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

दरम्यान, करोना प्रतिबंध लशीची सुरक्षितता, परिणामकारकतेबाबत साशंकता आणि अ‍ॅपच्या माध्यमातून तयार होणाऱ्या लाभार्थीच्या यादीतील त्रुटी यामुळे लसीकरणास अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र राज्यभर आहे.

राज्यात लसीकरणाला कमी प्रतिसाद

राज्यात लसीकरणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी उद्दिष्टाच्या ६४ टक्के लसीकरण झाले, तर मंगळवारी ५० टक्के लक्ष्य साधले गेले. बुधवारी त्यात पुन्हा वाढ होत ६८ टक्के नोंदले असून १८ हजार १६६ कमर्चाऱ्यांना लस देण्यात आली. मुंबईत सलग तिन्ही दिवशी उद्दिष्टाच्या ५० ते ५२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मुंबईत बुधवारी ३३०० लाभार्थ्यांपैकी १७२८ जणांना लस दिली गेली. ‘कोव्हॅक्सीन’ लशीला मान्यता मिळाली असली तरी इतर राज्यांमध्ये चाचणीच्या टप्प्यात आढळलेल्या दुष्परिणांमुळे आरोग्य कमर्चाऱ्यांमधील भीती अजूनही कायम आहे.