राज्यात आज (शनिवार) देखील मागील २४ तासांमध्ये आढळलेल्या नव्या कोरनाबाधितांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांपेक्षा अधिक आढळून आली आहे. राज्यभरात ३ हजार ६११ नवे करोनाबाधित वाढले असून, १ हजार ७७३ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय ३८ रुग्णांचा मृत्यू देखील झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ६० हजार १८६ वर पोहचली आहे.

याशिवाय राज्यात आतापर्यंत १९ लाख ७४ हजार २४८ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) आता ९५.८३ टक्के झाले आहे. अॅक्टिव्ह केसेसची संख्या ३३ हजार २६९ असून, आजपर्यंत ५१ हजार ४८९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

राज्यात पुन्हा करोना रुग्णांत वाढ

राज्यात उतारणीला लागलेला करोना रुग्णसंख्येचा आलेख या आठवडय़ात पुन्हा वर गेला आहे. यात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्य़ात आठवडाभरात पाच टक्के रुग्ण वाढले आहेत. राज्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत हा आलेख घसरत अडीच हजारांपर्यंत आला होता. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच यात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.