राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र तरी देखील रूग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार ८२७ नवीन करोनाबाधित आढळले असून, २०२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.९१ टक्के एवढा आहे.

दरम्यान आज २४ हजार १२६ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २४,५७,४९४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.६२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०१,५८,७१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २९,०४,०७६ (१४.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१,०१,९९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १९,२३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात लवकरच दररोज अडीच लाख चाचण्या केल्या जाणार – मुख्यमंत्री

रूग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याने आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागतो की काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्शअवभूमीवर आज राज्यातील करोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला ऑनलाईन संबोधित केलं. यावेळी त्यांनी राज्यातील चाचण्यांची संख्या वाढवून दररोज अडीच लाख चाचण्या सुरू केल्या जाणार असल्याचे सांगितले.

“काही कडक निर्बंध येत्या काही दिवसांत लावावे लागतील. ते उद्या किंवा परवा जाहीर होतील” असा सूचक इशारा दिला. यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“हा आजचा काय टीजर होता का?”; मुख्यमंत्र्यांना भाजपाचा सवाल

“भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे, आता अजून कुणाशी चर्चा करणार आहात , घ्या की निर्णय ….नेहमीप्रमाणेच या बाबतीतही निर्णय दिरंगाई. इतक्या महिन्यांत जे नाही झाले ते पुढच्या दोन दिवसांत काय मोठा चमत्कार घडणार आहे. अहो सत्य परिस्थिती, वास्तव काय समोर मांडताय…त्याची सर्वाधिक झळ तर आम्हाला बसतेय. या वास्तवाला जबाबदार कोण ? …चिंताजनक दिशेने तुम्हीच तर ढकलले.करोनाचे अवतार सांगताय पण सरकारचा खरा अवतार जनतेला दिसला.” असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.