राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढताना दिसत आहे. मात्र असे जरी असले तरी करोनातून बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही वेगाने वाढत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ५९ हजार ५०० रूग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, ४८ हजार ६२१ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय ५६७ रूग्णांचा आज मृत्यू देखील झाल्याचे समोर आले आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४०,४१,१५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८४.७ टक्के एवढे झाले आहे. तर, आजपर्यंत राज्यात करोनामुळे ७० हजार ८५१ रूग्णांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७८,६४,४२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७,७१,०२२ (१७.१२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,०८,४९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २८,५९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,५६,८७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

‘सीरम’ने काहीही करून महाराष्ट्राला लस देताना झुकतं माप द्याव – आरोग्यमंत्री टोपे

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ही महराष्ट्रात पुण्यात आहे त्यामुळे अदर पूनावाला यांनी लस देण्याच्याबाबतीत महाराष्ट्राला काहीसं झुकतं माप द्यावं, अशी विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राज्यात सध्या करोना संसर्ग वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने कोरनाबाधित आढळून येत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यालाही सुरूवात झाली आहे. मात्र, लस तुटवड्यामुळे राज्य सरकारकडून हा लसीकरणाचा टप्पा राबवताना अडथळे येत असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आज आरोग्यमंत्री टोपेंनी सीरमचे पूनावाला यांना ही विनंती केल्याचे दिसत आहे.