भारतात करोनाबाधित रुग्णसंख्या २ लाख ३६ हजार ६५७ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १ लाख १४ हजार ७२ रुग्णांवर उपचार करुन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. तर मृतांची संख्या ६६४२ झाली आहे. देशातील सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८० हजारांवर पोहोचली आहे. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत राहिली तर तर लवकरच महाराष्ट्र रुग्णसंख्येत चीनलाही मागे टाकण्याची शक्यता आहे. करोनाच्या फैलाव होण्यास जेथून सुरुवात झाली त्या चीनमध्ये सध्या करोनाचे ८४ हजार रुग्ण आहेत.

राज्यात २४ तासांत २४३६ रुग्णांची नोंद
राज्यात शुक्रवारी करोनाच्या २४३६ नव्या रुग्णांचे निदान झालं. राज्यात एकूण ८०,२२९ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात शुक्रवारी १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. शुक्रवारी १३९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २८४९ जणांचे बळी गेले आहेत.

महाराष्ट्रानंतर तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीचा क्रमांक असून या राज्यांनाही मोठा फटका बसला आहे. तामिळनाडूत करोनाचे २८ हजार ६९४ रुग्ण असून आतापर्यंत २३० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १५ हजार ७६२ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. दुसरीकडे दिल्लीत करोनाचे २६ हजार ३३४ रुग्ण असून ७०८ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. गुजरातमध्ये करोना रुग्णांच्या संख्येने १९ हजारांचा टप्पा पार केला असून ११९० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३ हजार जणांना उपचार करुन घरी सोडलं आहे.

भारत जागतिक यादीत सहाव्या स्थानावर
देशात सलग दुसऱ्यादिवशी नऊ हजारपेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. करोना व्हायरसमुळे शुक्रवारी २९५ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी इतके मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत इटलीला मागे सोडून करोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इटलीमध्ये दोन लाख ३४ हजार ५३१ रुग्णांना करोनाची बाधा झाली होती. भारतात हीच संख्या दोन लाख ३६ हजार ११७ आहे. भारतात करोना चाचणीचा वेग वाढल्यामुळे रुग्ण संख्या देखील वेगाने वाढत आहे.

चार दिवसांत ९०० मृत्यू
करोनाबाधितांचे पहिले एक हजार मृत्यू ४८ दिवसांत झाले, पण गेल्या चार दिवसांमध्ये एक हजार मृत्यू झाले आहेत. १ ते ४ जून या काळात मृत्यूची संख्या ५१६४ वरून ६०७५ झाली. १२ मार्च रोजी पहिला करोना रुग्ण मृत्यू झाला. त्यानंतर ४८ दिवसांनी म्हणजे २९ एप्रिल रोजी एक हजार मृत्यू नोंदवले गेले. नंतर मात्र प्रत्येक एक हजार मृत्यूसाठी ११, ८, ७, ६ आणि ४ दिवस लागले. पुढील प्रत्येक हजार मृत्यूच्या टप्प्यासाठी कमी दिवस लागले.