महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण  मंडळातर्फे मार्च २०२०  मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल ९६.०७ टक्के लागला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २० टक्क्यांची वाढ झाली. मात्र मुंबई विभागात रायगड जिल्हा शेवटच्या स्थानी आहे. दरवषीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. ९४.९१ टक्के मुलं तर ९७.३३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तालुका निहाय निकालाच्या टक्केवारीत पनवेल, महाड आणि माणगाव तालुके अव्वल ठरले आहेत.

आणखी वाचा- SSC Result : राज्याचा एकूण निकाल ९५.३० टक्के; यावर्षीही मुलींचीच बाजी

रायगड जिल्ह्यात  दहावीच्या परीक्षेसाठी ३५ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी  नोंदणी केली होती. ३५ हजार १६०  विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यापैकी ३३ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रायगडचा एकुण निकाल ९६.०७ टक्के लागला.  १० हजार ४२८  विद्यार्थी विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. १३ हजार २९० विद्यर्थ्यांना प्रथमवर्ग मिळाला. ८ हजार ०४०  विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर २ हजार २० विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.

आणखी वाचा- दहावीच्या निकालात राज्यात कोकण विभागाची बाजी

मुलांच्या तुलनेत मुली पास होण्याचे प्रमाण अधिक राहिले. ९७.३३ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर ९४.९१ टक्के मुले उत्तीर्ण झाली. १८ हजार ३५७ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १८ हजार २९८ मुलं परीक्षेला बसली होती. त्यातील १७ हजार ३६७ उत्तीर्ण झाली. तर १६ हजार ९३९ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. १६ हजार ८६२ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १६ हजार ४११ मुली उत्तीर्ण झाल्या. रायगड जिल्ह्यातील पनवेल, महाड आणि माणगाव तालुक्यांचा निकाल सर्वाधिक लागला, पनवेल, महाड तालुक्याचा निकाल ९७.२८ तर खालापूर तालुक्याचा सर्वात कमी ९३.०४ टक्के निकाल लागला.