महात्मा फुले वाडा हे माझे पॉवर स्टेशन आहे. या ठिकाणी आल्यावर मला कायम उर्जा मिळते. ही उर्जा घेऊन रविवारच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे. जे बोलायचे आहे ते उद्याच बोलेन अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. पुण्यातील महात्मा फुले वाड्याला त्यांनी आज भेट दिली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महात्मा फुले वाडा हे माझे पॉवर स्टेशन आहे असे म्हटले आहे.

उद्या काय बोलणार असा प्रश्न विचारला असता, मी दोन वर्षे तुरुंगात होतो आज पुण्यात आलोय तुम्हीच मला मुद्दे द्या असे म्हणत त्यांनी पत्रकारांचीच फिरकी घेतली. छगन भुजबळांनी असे म्हणताच एकच हशा पिकला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २० वा वर्धापन दिन पुण्यातील सहकारनगर मधील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थिताना मार्गदर्शन करणार आहेत. याच सभेत छगन भुजबळ यांचीही उपस्थिती असणार आहे. ते काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

छगन भुजबळ हे अटकेत असताना.त्यांना विविध आजारामुळे त्यांचा कित्येक महिन्यांपासून रुग्णालयात मुक्काम होता.त्याच दरम्यान त्यांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.त्यानंतर त्यांना सर्व पक्षातील नेत्यांनी भेटण्याची रीघ लावली होती.भुजबळांची शिवसेनेच्या नेत्यांशी वाढलेली जवळीक लक्षात घेता ते शिवसेनेत जातील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती.

मात्र रविवारी पुण्यात होणाऱ्या राष्ट्रवादी होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास भुजबळ उपस्थित राहून तब्बल दोन वर्षांनंतर राजकीय व्यासपीठावर येऊन त्यांची भूमिका मांडणार आहेत. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.त्या पूर्वी आज पुण्यात छगन भुजबळ आल्यावर त्यांनी महात्मा फुले वाड्यास भेट देऊन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या अर्ध पुतळ्यास त्यांनी यावेळी अभिवादन केले .यावेळी त्यांच्या समावेत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते देखील उपस्थित होते.