केडगाव उपनगरात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी हत्याप्रकरणी  मुख्य आरोपी, काँग्रेसचा नगरसेवक विशाल कोतकर व रवी खोल्लम हे दोघे परप्रांतात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या शोधाकरिता दोन पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. खोल्लम हा शाहूनगरमध्ये राहतो. त्याचा शोध घेण्यासाठी संजय कोतकर व वसंत ठुबे गेले होते. त्यानंतर विशाल कोतकरच्या सांगण्यावरून दोघांचा खून करण्यात आला. या खुनाचे नेमके कारण व आरोपी हे विशाल कोतकर व खोल्लम याला अटक केल्यानंतर उघड होणार आहे. खोल्लम हा छायाचित्रकार असून विशाल कोतकरचा मित्र आहे. खोल्लम याचा भाऊ राजू खोल्लम हा भानुदास कोतकर याच्या भैरवनाथ पतसंस्थेत उपव्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. दोघांचाही शोध घेतला जात असून ते परप्रांतात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

संजय कोतकर व वसंत ठुबे यांचा दशक्रियाविधी उद्या, सोमवारी केडगावमधील शांतिवनात होणार आहे. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शिवसैनिक मुंबईला रवाना होतील. दशक्रियाविधीच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. राज्य राखीव पोलीस दल व दंगलनियंत्रण पथकाच्या तुकडय़ा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.  केडगाव उपनगरात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दुहेरी हत्याप्रकरणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे बुधवारी (दि.२५) नगरला येणार आहेत.

मध्यप्रदेशातून पिस्तूल आणले

बाबा केदार याने विशाल कोतकर याला व त्याच्या साथीदारांना गावठी पिस्तुले दिली असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. मध्यप्रदेशातून त्याने ही पिस्तुले आणली होती. मात्र केदार याने किती पिस्तुले विकली हे अद्याप चौकशीत निष्पन्न झालेले नाही. केदार हा गुन्हेगारी वर्तुळाशी जोडलेला आहे. मात्र तो पोलिसांना पुरेशी माहिती देत नाही. विशाल कोतकरच्या अटकेनंतरच बेकायदा शस्त्रास्त्र विक्रीच्या प्रकरणावरही प्रकाश पडू शकेल.