हर्षद कशाळकर

निसर्ग चक्रीवादळाला गुरुवारी तीन महिने पूर्ण होत आहेत. मात्र वादळग्रस्त शाळांच्या दुरुस्तीचा प्रश्न अजूनही कायम आहे. शाळा दुरुस्तीसाठी २४ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित होता. मात्र जेमतेम साडेसात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

निसर्ग चक्रीवादळ कोकण ३ जूनला किनारपट्टीवर धडकले. ताशी ११० किलोमीटर वेगाने आलेल्या या वादळाचा रायगड जिल्ह्य़ाला जोरदार तडाखा बसला. यात मोठी वित्तहानी झाली. दोन लाख कुटुंबे  वादळाने बाधित झाली. ११ हजार हेक्टर बागायतींचे नुकसान झाले. वादळात शासकीय मालमत्तांचेही अतोनात नुकसान झाले. यात शाळा आणि अंगणवाडय़ांच्या इमारतींचा समावेश आहे. तीन महिन्यांनंतरही शाळा आणि अंगणवाडय़ा दुरुस्तीसाठी निधीची प्रतीक्षा कायम आहे.

माणगावमध्ये सर्वाधिक नुकसान

वादळात रायगड जिल्हा परिषदेच्या १ हजार ५५१ शाळांचे नुकसान झाले, तर १ हजार ५०० शाळांचे अंशत: नुकसान झाले आणि  ५१ शाळा पूर्णपणे कोसळल्या आहेत. २ हजार ३९६ वर्गांचे नुकसान  झाले आहे. माणगाव तालुक्यात सर्वाधिक २७१ शाळांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान ३९ कोटी १८ लाख रुपयांच्या आसपास आहे. या शिवाय १८६ खाजगी शाळांची वादळात वाताहत झाली आहे.

नादुरुस्त शाळांच्या दुरुस्तीसाठी २४ कोटी रुपयांचा प्रस्ताव, रायगड जिल्हा परिषदेने शासनाला सादर केला होता. मात्र जवळपास तीन महिन्यात शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. आता साडेसात कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप हा निधी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे शाळा दुरुस्तीच्या कामांना सुरुवातही होऊ शकलेली नाही.

प्राप्त होणारा निधी अपुरा असल्याने दुरुस्ती कशी आणि कुठे करायची हा प्रश्नही शिक्षण विभागासमोर असणार आहे. या शिवाय खाजगी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोन लाखांपर्यंतची मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी जवळपास सहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पण या शाळांसाठीही निधी उपलब्ध झालेला नाही.

करोनाने शाळा सध्या तरी बंद राहणार आहेत. पण शाळा सुरू करायची वेळ आली, तर नादुरुस्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांंना बसवायचे तरी केसे हा प्रश्न कायम आहे. निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्य़ातील १ हजार ३५० अंगणवाडय़ांचे नुकसान झाले होते. या अंगणवाडय़ांच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी रुपयांची गरज आहे. मात्र अंगणवाडय़ांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही.

राज्य शासनाकडे निसर्गात पडझड झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठीच्या निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी साडेसात कोटी निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यात येईल. उर्वरित निधीही लवकर मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

– अदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड