01 March 2021

News Flash

विदर्भ भाजपचा गड असल्याच्या फुग्याला टाचणी

विकासाच्या या सर्व योजनांपासून भंडारा व गोंदिया दूर राहिले याची जाणीव सत्ताधाऱ्यांना कधी झाली नाही.

विजयी उमेदवार मधुकर कुकडे

नागपूर : भाजपसाठी सारे वातावरण अनुकूल असताना भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीने नोंदवलेला विजय हा ‘विदर्भ भाजपचा गड’ या रूढ समीकरणाला छेद देणारा ठरला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील मतदार भाजपवर नाराज असल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे. सारा देश भाजपमय झाला असताना पक्ष सोडण्याची व मोदी यांना आव्हान देण्याची हिंमत दाखवणारे नाना पटोले व मतभेद विसरून एकत्र येणारे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजकारणाला या निकालाने संजीवनी मिळाली आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार पक्षाचे, बहुतेक सर्व पालिकांमध्ये पक्षाची सत्ता, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवरसुद्धा पक्षाचे वर्चस्व असे सारे अनुकूल वातावरण असताना भाजपला मतदारांनी झटका दिल्याने गडातच फजिती सहन करण्याची पाळी या पक्षाच्या नेत्यांवर आली आहे. केंद्रातील मोदी सरकार शेतकरी व ओबीसीविरोधी आहे, असा आरोप करून नाना पटोलेंनी खासदारपदाचा राजीनामा दिला. त्याला संदर्भ होता मोदींनी केलेल्या अपमानाचा. यातून नानांचा वैयक्तिक अहंकार डोकावला असा आरोप भाजपने या वेळी प्रचारात जोरदारपणे केला. नानांवर व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा राज्य व केंद्राने गेल्या चार वर्षांत केलेली कामगिरी प्रचारात सांगितली असती तर या निवडणुकीचे चित्र वेगळे राहिले असते. भाजपला निवडणूक व्यवस्थापनातील नेमकी हीच चूक नडली असे या पक्षाचे नेते आता खासगीत बोलून दाखवत असले तरी त्यात पूर्णाशाने तथ्य नाही. राज्य व केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर भाजपच्या विदर्भप्रेमी नेत्यांनी या प्रदेशासाठी भरपूर काही केले असा प्रचार गेली चार वर्षे सातत्याने केला. प्रत्यक्षात या सरकारने आणलेल्या योजनांचा लाभ सामान्यजनांच्या पदरी किती पडला हा संशोधनाचा विषय होता. आता या निकालाने या संशोधनाला वाट मोकळी करून दिली आहे. सरकारने कर्जमाफी दिली तरी शेतकऱ्यांची नाराजी दूर झालेली नाही. हा वर्ग सरकारवर नाराज आहे या विरोधकांच्या दाव्याला या निकालाने पुष्टी मिळाली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तोंडवळा शहरी आहे. गावात वीज व प्रत्येक घरी गॅस या दोन योजना ग्रामीण भागाशी संबंधित असल्या तरी त्याच्या यशाबाबत अजून साशंकता आहे. ग्रामीण भागात शेती हाच मुख्य मुद्दा आहे. नेमका हाच शेतकरीवर्ग सरकारांवर नाराज असल्याचे या निकालातून दिसून आले आहे. भंडारा व गोंदिया या दोन मोठय़ा शहरात भाजपला बरी मते मिळाली, पण उर्वरीत ग्रामीण भागात हा पक्ष खूपच माघारला हे मतमोजणीतून दिसून आले. भाजपने विदर्भाला सुजलाम सुफलाम करू असे म्हणत समृद्धी व इतर अनेक महामार्गाच्या घोषणा केल्या. अमरावती व नागपुरात उद्योगांना चालना दिली.

विकासाच्या या सर्व योजनांपासून भंडारा व गोंदिया दूर राहिले याची जाणीव सत्ताधाऱ्यांना कधी झाली नाही. आता निकालाने ती करून दिली आहे. प्रचारात भाजपने नानांना लक्ष्य केले होते तरी राष्ट्रवादी व काँग्रेसने त्यांच्या प्रचाराचा जोर केंद्र व राज्याच्या अपयशी कारभारावरच केंद्रित केला होता. त्याला मतदारांनी उचलून धरल्याने आता भाजपची चिंता वाढली आहे. भाजपने या वेळी प्रशासकीय यंत्रणेचासुद्धा गैरवापर केला. विदर्भात हे प्रथमच घडले. प्रचार संपल्यावर शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई वाटण्यात आली. त्यासाठी रात्रभर बँका व कोषागार कार्यालये उघडी ठेवण्यात आली. त्याचाही फायदा सत्ताधाऱ्यांना झाला नाही. भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, अहीर व अनेक मंत्र्यांची फौज प्रचारात होती. त्या तुलनेत राष्ट्रवादीची प्रचारयंत्रणा फारच अपुरी होती. पटेल व पटोले या दोघांनीच सारी सूत्रे हाताळली. दोन्ही काँग्रेस पक्ष एकत्र आले तर मतविभाजन टाळता येते व यश मिळवता येते, असा स्पष्ट संदेश या निकालाने दिला आहे.

या लोकसभाक्षेत्रात काही भागांत शिवसेनेचा प्रभाव आहे. सेनेचा विरोध लक्षात घेऊन भाजपने सेनेच्या सर्व स्थानिक नेत्यांना पक्षात सामावून घेतले. त्याचाही फायदा या पक्षाला मिळू शकला नाही. चार वर्षांपूर्वी नाना पटोले हे अडीच लाखांच्या मताधिक्याने येथून निवडून आले होते. तेव्हा मोदींची लाट होती. ती आता पूर्णपणे ओसरल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे. भाजपने या निवडणुकीची जबाबदारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिली होती. त्यासाठी म्हणून त्यांना या जिल्ह्य़ाचे पालकमंत्री करण्यात आले. त्यांच्या दिमतीला अनेक आमदार, शेकडो पान व बूथप्रमुख व बाहेरून आणलेले हजारो प्रशिक्षित कार्यकर्ते होते. जनमत विरोधात केले की गाजावाजा करून उभी केलेली अशी संघटनात्मक रचना काही उपयोगात येत नाही हा धडा या निकालातून भाजपला मिळाला आहे.

विद्यमान सरकारांवर दलित व आदिवासी नाराज आहेत. त्यामुळे ती मते आपल्यालाच मिळतील या भ्रमात राहणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा भोपळासुद्धा या निकालाने फोडला आहे. नाना पटोलेंच्या अहंकाराचा उल्लेख सातत्याने भाजपने केला त्याची लागण आपल्याच पक्षातील नेत्यांना झाली आहे व सत्तेमुळे हे नेते जनतेपासून दूर जात आहे. याची जाणीव या निकालाने सत्ताधाऱ्यांना करून दिली आहे.

उतरंड सुरू

नाना पटोलेंनी २००८ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन वर्षांनी भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये पक्षाला पूर्ण बहुमताची सत्ता मिळवून दिली होती. २०१० मधील या घटनेनंतर भाजपची राज्यात सत्तेकडे वाटचाल सुरू झाली व चार वर्षांत या पक्षाला लक्षणीय यश मिळाले. आता त्याच नाना पटोलेंनी काँग्रेसच्या मदतीने सत्ताधारी भाजपला प्रथमच विदर्भात पराभवाची धूळ चाखायला लावली आहे. त्यामुळे पक्षाची उतरंड तर आता सुरू झाली नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2018 3:48 am

Web Title: major setback for bjp in vidarbha after losing bhandara gondia bypoll
Next Stories
1 ‘एसटी’च्या जीवघेण्या अपघातात ६० टक्के वाढ
2 बारावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार
3 अभ्यासक्रमाचे संलग्नीकरण रद्द, प्रवेशही गोठवले
Just Now!
X