राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

उमाकांत देशपांडे, लोकसत्ता

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे दोन महिन्यांपासून रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली तालुक्यात इंटरनेट सेवा विस्कळीत असून ती दोन दिवसांमध्ये सुरळीत करावी, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना नवी दिल्लीत व्यक्तिश: हजर राहण्यासाठी समन्स जारी करावे लागेल, अशी नोटीस राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने जारी केली आहे.

संपर्क यंत्रणा विस्कळीत झाल्याची गंभीर दखल घेतल्याने ती सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.  करोना संकटकाळात ऑनलाइन  शिक्षण सुरू आहे. पण चक्रीवादळानंतर दापोली तालुक्यात गेले दीड-दोन महिने इंटरनेट व मोबाईल सेवा विस्कळीत आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षण हक्कावर गदा येत असून त्यांच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे यासंदर्भात विनय जोशी यांनी आयोगापुढे तक्रार दाखल केली आहे.  आयोगाने संकटकाळात ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी दखल घेण्याचे हे दुर्मीळ उदाहरण आहे.

चक्रीवादळामुळे हर्णे, आंजर्ले, अडे, केळशी आदी परिसरात मोठे नुकसान झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील ८० पैकी ७५ टॉवर्सचे मोठे नुकसान झाले. संपर्क यंत्रणा सुरळीत करण्याचे भारत संचार निगमच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असून बरेच काम पूर्ण झाले आहे. त्यांना वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत. 

       – लक्ष्मी नारायण मिश्रा जिल्हाधिकारी रत्नागिरी

संपर्कयंत्रणा व्यवस्था हा महत्त्वाचा अधिकार

संपर्कयंत्रणा व्यवस्था हा नागरिकांसह मुलांचाही महत्त्वाचा अधिकार आहे. मोबाइल कंपन्यांना प्रत्येक विभागात दिलेले परवाने हे केवळ त्यांना नफा कमावण्यासाठी दिलेले नसून अखंडित सेवा देण्याचीही त्यांची जबाबदारी आहे. मोबाइल व इंटरनेट सेवा विस्कळीत असेल, तर करोनाकाळात विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत आहेत. त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारांना बाधा पोचत आहे, असे बालहक्क आयोगाने स्पष्ट केले आहे. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ भारत संचार निगमच्या सेवेबाबत आयोगाला ३१ जुलैला आयोगाला माहिती दिली आहे. पण ती पुरेशी नसून खासगी मोबाइल कंपन्यांच्या सेवाही दोन दिवसांमध्ये पूर्ववत कराव्यात, असे आयोगाने बजावले आहे.