खरगे यांचा सवाल; काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा

जळगाव :

देशासाठी काँग्रेसच्या इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यासह असंख्य नेते, कार्यकर्त्यांनी प्राणाची आहुती दिली आहे. दुसरीकडे देशभक्तीचा आव आणणाऱ्या भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील कोणी बलिदान दिले आहे काय, त्यांनी देशासाठी काय केले, असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे लोकसभेतील नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप, संघावर जहरी भाषेत टीकास्त्र सोडले.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास गुरुवारी फैजपूर येथून सुरुवात झाली. यावेळी खरगे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या किमती यावर पंतप्रधान मोदी बोलत नाहीत. मात्र मतांचे विभाजन करण्यासाठी, पुन्हा पंतप्रधान बनण्यासाठी ते भाषण करत फिरत आहेत. कायदा-सुव्यवस्था बिघडत आहे. शेतकरी आत्महत्या, दलित यांच्याकडे सरकारचे लक्ष नाही. महिला, लहान मुलांच्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर सरकार ठोस भूमिका घेत नाही. या विषयांवर पंतप्रधानांनी संसदेत बोलावे अशी मागणी आम्ही करतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत मोदी हात बांधून शांत बसून राहतात, असे खरगे यांनी सांगितले. मागील निवडणुकीत मोदींनी अनेक आश्वासने देऊन मते मागितली. मात्र एकही आश्वासन त्यांना पूर्ण करता आले नाही. खोटं बोलणं हे मोदींचे काम आहे.

काँग्रेसने ७० वर्षांत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत रेल्वेचे जाळे पसरवले. मोदी केवळ मुंबई ते अहमदाबाददरम्यान बुलेट ट्रेन आणण्याचा दिखावा करून टाळ्या मिळवत असल्याचा टोला त्यांनी लगावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा भाजप वापर करीत आहे. या देशात संविधान फाडणाऱ्यांना हे सरकार पाठिशी घालते. यामुळे त्यांना बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ते फक्त मतांसाठी त्यांच्या नावाचा वापर करत आहे, अशी टीका खरगे यांनी केली.

अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.