कुपोषणाने दोन लहानग्यांचे बळी गेलेल्या पालघरमधील मोखाडा तालुक्यातील गावकऱ्यांनी आता शाळेलाच कुलूप ठोकले आहे. पहिली ते आठवी इयत्तेसाठी असलेल्या तीनपकी दोन खोल्यांची गेल्या मे महिन्यात झाड पडल्याने पडझड झाली. मात्र अजूनही या खोल्यांची दुरुस्ती करायला सरकारी यंत्रणांना जाग आलेली नसल्याने पटावरील १६१ विद्यार्थ्यांसाठी एकच खोली शिल्लक राहिली आहे. अनेकदा सरकारदरबारी खेटे घालूनही दाद घेतली जात नसल्याने शाळेलाच कुलूप ठोकून पंचायत समितीत मुलांना बसवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. कुपोषणामुळे सप्टेंबरमध्ये मृत्यू पावलेल्या सागर वाघ व ईश्वर सवरा या मुलांच्या मित्रांचे भविष्य हे असे आहे.

मोखाडा तालुक्यापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर खोच ग्रामपंचायतीत धोंडामारयाची मेठ हे गाव येते. शेजारच्याच कळमवाडीत सागर वाघ या मुलाचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. त्या वेळी त्याच्या घरी महिला व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली होती. तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या पहिली ते आठवीच्या शाळेला कुलूप घालण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. शाळेच्या मागच्या बाजूला असलेले झाड तीन खोल्यांच्या या शाळेवर पडले. त्यामुळे दोन खोल्या मोडल्या आणि मागच्या बाजूला बांधलेल्या शौचालयांच्या पार चक्काचूर झाला. संपूर्ण पावसाळा शाळेतील सर्व विद्यार्थी एका खोलीत बसत होते. पावसाळ्यानंतर दोन्ही खोल्यांची डागडुजी व्हावी यासाठी प्रयत्न केले, मात्र आता वर्ष संपत आले तरी जिल्हा परिषदेकडून शाळेच्या बांधकामाला निधी मंजूर झालेला नाही, असे या गावचे सरपंच पांडू मालक यांनी सांगितले. एकीकडे पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मोहीम हाती घेतली आहे आणि इथे आमच्या शाळेचे शौचालय मोडून पडले आहेत. मुलींची एवढी गरसोय होत असताना त्या शिकणार कशा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शाळेला कुलूप लावल्याने विस्तार शिक्षण अधिकारी आल्या होत्या. मात्र प्रस्ताव पुढे पाठवला आहे, माझ्या हातात काही नाही, शाळा सुरू करा यापलीकडे सांगण्यासारखे त्यांच्याही हाती काही नव्हते. शाळेत आठवीपर्यंत शिकवण्यासाठी फक्त तीन शिक्षक आहेत. मात्र तरीही आजूबाजूच्या परिसरातील शाळांची अवस्था यापेक्षा वाईट असल्याने तेथील मुलेही इथे येतात. आता या शाळेचीही अशी अवस्था झाली की मुले शिकणार कशी, पुढे जाणार कशी, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला. शिक्षण विभागाकडून दाद लागू दिली जात नसल्याने शेवटी गावकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. एकीकडे देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना गावकऱ्यांनी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट पंचायत समितीच्या कार्यालयात नेऊन बसवले. कुपोषणामुळे गावाला भेट देणाऱ्या मंत्री व अधिकाऱ्यांच्या मात्र हे गावीही नाही. कुपोषणाचा प्रश्न हा केवळ अन्नाशी नाही तर जीवनशैलीशी निगडित आहे, मात्र अंगणवाडीतील केळे, अंडे व खिचडीपलीकडे या प्रश्नाकडे पाहण्यास सरकारला वेळ नाही, असेच या स्थितीवरून दिसते.

वाडा आणि मोखाडय़ाच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलांची संख्या पाहता या तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न संपला असेच सरकारला म्हणायचे आहे, असे दिसते. कुपोषणग्रस्त भागासाठी सप्टेंबरमध्ये मंत्र्यांचा दौरा आखण्यात आला तेव्हा मोखाडय़ाच्या रुग्णालयात उपचारांसाठी तब्बल ९१ कुपोषित मुलांना आणले गेले होते, त्यापकी ५८ तीव्र कुपोषित, तर ३९ कुपोषित होती. मंत्र्यांचा दौरा आटोपला आणि ऑक्टोबरमध्ये उपचारांसाठी आलेल्या बालकांची संख्या थेट २६ वर घसरली. नोव्हेंबरमध्ये ही संख्या १३ वर आली होती. डिसेंबर महिन्यात मोखाडय़ाच्या रुग्णालयात सात कुपोषित मुलांवर उपचार करण्यात आले त्यातील दोन तीव्र कुपोषित होती. जानेवारीत आलेल्या पाचपैकी दोघांमध्ये तीव्र कुपोषणाची लक्षणे होती.

मोखाडय़ाच्या बाजारापासून साधारण बारा किलोमीटरवर असलेल्या शिसवण्याच्या पाडय़ावर नुकतेच आरोग्य शिबीर घेण्यात आले. तेथून दहा कुपोषित मुलांना मोखाडय़ाच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला गेला. मात्र त्यातील पाचच मुले मोखाडय़ाच्या रुग्णालयात आली. इथे १४ दिवस राहावे लागते. एवढा वेळ इथे राहिलो तर कामधंदा होणार नाही, म्हणून बाकीची मुलं आली नाहीत, असे जाई दोरे म्हणाल्या. स्वत:च्या तीन वर्षांच्या मुलीसोबत त्या उपचारांसाठी रुग्णालयात राहिल्या होत्या. आम्ही वर डोंगरावर राहतो, त्यामुळे गावात डॉक्टर आले तरी कोणी सांगितल्याशिवाय आम्हाला कळत नाही. मुलं अंगणवाडीत मात्र जातात, त्यांना अंडे, केळे देतात, असे योगिता मालकच्या आज्जीने सांगितले. आईला वेळ नसल्याने त्या योगितासोबत रुग्णालयात राहत होत्या.

या मुलांवर उपचार केले जातात, मात्र त्यांचा इथला आहार बंद झाला, औषधे बंद झाली की ती पुन्हा अशक्त होतात. अनेक मुलांना पुन्हा पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागते. शासनाकडून जिल्हा रुग्णालयांना जेवढी मदत यायला हवी, तेवढी येथे मिळते. मात्र मुलांसाठी विशेष डॉक्टर नसल्याने गंभीर स्थिती असलेल्या मुलांना इतर रुग्णालयांत न्यावे लागते, असे येथील वैद्यकीय अधिकारी महेश पाटील म्हणाले.

वाडा तालुका हा मोखाडय़ाच्या तुलनेत सुधारलेला म्हणावा अशी स्थिती. मात्र या तालुक्यातील रुग्णालयातही शस्त्रक्रियेची सोय नाही. गेल्याच आठवडय़ात जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी तिथे शिबीर घेतले, मात्र रक्तपेढीची सोय नसल्याने अगदी लहान शस्त्रक्रियांशिवाय इतर कोणतेही उपचार करता आले नाहीत. याचा परिणाम फक्त एकच झाला तो म्हणजे कुपोषित मुलांच्या विभागात या रुग्णांची सोय केली गेल्याने जानेवारीत केवळ सात कुपोषित मुलांवर उपचार करता आले. आरोग्य व शिक्षणासाठी सर्वात जास्त लक्ष देण्याची गरज असलेल्या या भागात दोन्हींची अवस्था ही अशी आहे.

मोखाडा तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर धोंडामारयाची मेठ येथे शाळेच्या बाजूला असलेले झाड शाळेवर पडले. त्यामुळे दोन खोल्या मोडल्या आणि मागच्या बाजूला बांधलेल्या शौचालयांच्या चक्काचूर झाला. दहा कुपोषित मुलांना मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला गेला. मात्र त्यातील पाचच मुले मोखाड्याच्या रुग्णालयात आली.