06 December 2019

News Flash

अनैतिक संबंधाच्या संशयावरूनच आटपाडीत पतीकडून खून

अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच या महिलेचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली : आटपाडी तालुक्यातील माडगुळे येथे महिलेचा झालेला खून अनैतिक संबंधाच्या संशयावरूनच पतीने केला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून पतीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले.

दहा दिवसांपूर्वी माडगुळे (ता. आटपाडी) येथे झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीनेच या महिलेचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी अनिल सीताराम झोडगे (वय ४८) याला अटक करण्यात आली आहे.

माडगुळे (ता. आटपाडी) येथील आशाबाई अनिल झोडगे (वय ४५) या महिलेचा ७ एप्रिल रोजी अज्ञाताने कात्रीने गळ्यावर वार करून खून केला होता.

आशाबाई झोडगे या पतीसह शेतात कामाला गेल्या होत्या. उन्हामुळे त्यांना चक्कर आली, त्यामुळे त्यांना पती अनिल यांनी घरी आणून सोडले व परत ते शेतात कामाला निघून गेले. त्यानंतर दुपारी १ ते २ च्या सुमारास शिवणकामासाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार कात्रीने आशाबाई यांच्या गळ्यावर वार करून अज्ञाताने त्यांचा खून केला.

त्यांची सासू जेव्हा बाहेरून घरी आली, तेव्हा आशाबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले होते. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. पण डॉक्टरांनी गळ्यावर जखम केल्याने रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

एलसीबीच्या पथकाने सर्व संशयितांची कसून चौकशी केली. आशाबाई यांचा पती अनिल याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. अनतिक संबंधाच्या संशयावरून आशाबाईच्या गळ्यावर कात्रीने वार करून खून केल्याचे त्याने सांगितले. अनिल झोडगे याला एलसीबीने अटक करून पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

First Published on April 19, 2019 3:15 am

Web Title: man killed wife over suspicion of extramarital affair
Just Now!
X