नीलेश पवार

नंदुरबारमधील नेत्यांच्या पक्षांतराने कार्यकर्त्यांचे गणित चुकत आहे. या नाटय़ामुळे एकाच घरातून दोन, दोन राजकीय पक्षांचा कारभार हाकला जात आहे. यामुळे घराणेशाहीला बळ मिळाले असून संबंधित कुटुंबीयांची राजकीय मक्तेदारी निर्माण होत आहे.

एकाच घरातून दोन पक्षांचा कारभार चालविण्याची नंदुरबार जिल्ह्य़ातील परंपरा खंडित होण्याची चिन्हे नाहीत. या स्थितीमुळे पक्ष कार्यकर्त्यांची कोंडी असल्याचे नंदुरबारच्या राजकारणात दिसत आहे. स्थानिक पातळीवर जवळपास सर्वच प्रमुख घरांमधून दोन पक्षांचे प्रतिनिधित्व केले जात असल्याने नंदुरबारच्या राजकारणाची आगळीवेगळी ओळख समोर आली आहे. जिल्ह्य़ाच्या राजकारणात दबदबा असलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे वर्षभरापूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी या नंदुरबार नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा असून त्या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या आहेत. पालिकेतील बहुतांश नगरसेवक हे काँग्रेसचे असले तरी ते सध्या चंद्रकांत रघुवंशींसोबत शिवसेनेचे काम करत आहेत. असे असले तरी संबंधितांवर कारवाई करण्याचे धाडस काँग्रेसने दाखविले नाही. हे नगरसेवक स्वत:हून राजीनामा देऊ शकत नसल्याने रघुवंशी यांच्या कुटुंबातून शिवसेना आणि काँग्रेसचा कारभार सुरू आहे.

शहादा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष असलेले मोतीलाल तात्या पाटील हेदेखील भाजपच्या चिन्हावर निवडून आले. परंतु, त्यांचे पुत्र अभिजीत पाटील हे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला रामराम करत काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. ते जिल्हा परिषदेचे कृषी सभापती असून एकाच घरात भाजप आणि काँग्रेसचे सत्ताधारी पदाधिकारी असल्याचे जिल्ह्य़ातील हे अजून एक उदाहरण म्हणावे लागेल. अशीच राजकीय परिस्थिती ही तळोद्यातील राजकारणावर प्रभाव राखणाऱ्या पाडवी कुटुंबातील आहे. माजी आमदार असलेले उदेसिंग पाडवी हे प्रारंभी भाजप, नंतर काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यांचे चिरंजीव राजेश पाडवी हे सध्या शहादा -तळोदा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. दोन्ही पिता-पुत्रामधील राजकीय मतभेदाचा वाद सर्वश्रुत असला तरी एकाच घरात दोन पक्षांचे प्रतिनिधित्व पाडवी परिवार करीत आहेत. दुसरीकडे गावित परिवारातदेखील वेगळी स्थिती नाही.

डॉ. विजयकुनार गावित हे स्वत: भाजप आमदार असले तरी त्यांचे लहान बंधू असलेले शरद गावितांची राष्ट्रवादीची जवळीक आहे. शरद गावित हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांचा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरचा वावर असतो. पण, त्यांच्या दोन्ही कन्या मात्र जिल्हा परिषदेत भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. त्यामुळे गावित परिवाराचा विविध पक्षांतील संचार हा नवा विषय नाही.

एकाच घरातून दोन पक्षांचा कारभार चालविण्याची नंदुरबार जिल्ह्य़ातील परंपरा खंडित होण्याची चिन्हे नाहीत. या स्थितीमुळे पक्ष कार्यकर्त्यांची कोंडी असल्याचे नंदुरबारच्या राजकारणात दिसत आहे. स्थानिक पातळीवर जवळपास सर्वच प्रमुख घरांमधून दोन पक्षांचे प्रतिनिधित्व केले जात असल्याने नंदुरबारच्या राजकारणाची  ओळख समोर आली आहे.

एकाच कुटुंबात दोन पक्षांची जिल्हाध्यक्षपदे

दुसरे उदाहरण म्हणजे दिवंगत दिलीप मोरे यांच्या कुटुंबाचे. राष्ट्रवादीचे नेते असलेल्या दिलीप मोरे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला होता. शिवसेनेने त्यांचे चिरंजीव विक्रांत मोरे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची धुरा दिली. तर विक्रांत मोरे यांच्या मातोश्री शोभा मोरे यादेखील नंदुरबार पालिकेत सेनेच्या नगरसेवक आहेत. असे असताना याच परिवारातील चिरंजीव डॉ. अभिजीत मोरे यांची मागच्याच आठवडय़ात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. एकाच घरात, एकाच खताखाली राहून सध्या दोन पक्षांचे कामकाज मोरे कुटुंबीयांकडून चालविले जाणार आहे.