गेल्या दोन वर्षांत १३ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या पांढरकवडय़ातील ‘टी-१’ या पाच वर्षांच्या वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. मात्र, या वाघिणीच्या मृत्यूवरुन आता आरोपांची मालिका सुरु झाली आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी याप्रकरणी प्रचंड संतापल्या असून वाघिणीची ही हत्याच असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकापाठोपाठ एक असे सलग ट्विट करत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन खात्याला फैलावर घेतले आहे. वाघिणीचे मृत्यू प्रकरण आपण गांभीर्याने घेतल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांना म्हटले आहे. वाघिणीवर गोळी झाडणाऱ्या नवाब शआफ़तअली खान याच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

मनेका गांधी म्हणाल्या, अवनी या वाघिणीची ज्या निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचे मला अतीव दु:ख होत आहे. ही हत्याच आहे, हा गुन्हा आहे. अनेकांनी विनंती करुनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले. असे करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत त्यांनी तीन वाघ, शेकडो बिबटे आणि वन्य जिवांची हत्या केली आहे.

प्रत्येकवेळी ते हैदराबाद येथील नेमबाज नवाब शआफ़तअली खानचा वापर करतात. यावेळी खानने त्याच्या मुलालाही बरोबर घेतले होते. त्याच्या मुलाला हा अधिकार नाही. हे बेकायदा कृत्यच आहे. त्या वाघिणीला पकडण्याऐवजी एखाद्या नेमबाजाच्या हातून या वाघिणीची हत्या करण्यात आली आहे.

ही हत्याच असल्याचा उल्लेख मनेका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये सातत्याने केला आहे. यासाठी त्यांनी ‘ ‘ हा हॅशटॅग वापरला आहे.

शआफ़तअली खानवर त्यांनी गंभीर आरोप केले. खानने आतापर्यंत ३ वाघिणी किमान १० बिबटे, काही हत्ती आणि ३०० हून अधिक जंगलातील  प्राण्यांना मारले आहे. देशद्रोही लोकांना शस्त्रे पुरवणे आणि हैदराबाद येथील एका खून प्रकरणातील तो संशयित आरोपी आहे. तरीही सरकार त्यालाच नेहमी हे काम का देते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे प्रकरण मी वरपर्यंत नेणार आहे, असेही त्या म्हणाल्या.