बदलत्या हवामानामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त बनले आहेत. त्यासाठी संशोधन होण्याची मागणी आंबा उत्पादक करत आहेत. शिवाय आंबा निर्यातीसाठी सरकारने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
फयान वादळानंतर बदलते हवामान आंबा बागायतदारांच्या मुळावर आले आहे. थंडी, उष्णता, पाऊस आदींचा समतोल ढासळल्याने पर्यावरणीय समतोलाचा फटका आंबा शेतीवर होत आहे. त्यासाठी संशोधनाची गरज बागायतदारांना वाटते.
शासन व जिल्हा परिषद कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांच्यात समन्वय नसल्याने उत्पादकांना त्याचा फटका बसतो. पर्यावरणीय बदलामुळे मोहर, फळ प्रक्रिया, फळ धारणा व किडीचा प्रार्दुभाव शेतकऱ्यांना जाणवतो. गेली चार वर्षे बागायतदार नव्या संकटांना तोंड देत आहेत. त्यातून सावरण्यासाठी संशोधनाची गरज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंबा लागवडीखाली २८ हजार ४२० हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील १९ हजार ५०० हेक्टर क्षेत्र उत्पादनाखाली आहे. कणकवलीत २६५० हेक्टर क्षेत्रापैकी १८९० हेक्टर क्षेत्र, देवगडमध्ये १०६०० हेक्टरपैकी ७३०० हेक्टर, मालवण ४४०० हेक्टरपैकी ३०६० हेक्टर, वैभववाडी ७९० हेक्टरपैकी ४९० हेक्टर, सावंतवाडी २७५० हेक्टरपैकी १९४० हेक्टर, कुडाळ २९०० हेक्टरपैकी २१३० हेक्टर, वेंगुर्ले ३६५० हेक्टरपैकी २५३० हेक्टर व दोडामार्ग १३० हेक्टरपैकी ८५ हेक्टर क्षेत्र उत्पादनाखाली आहे, असे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील उत्पादित क्षेत्रात हेक्टरी तीन टन उत्पादन मिळते असे सांगितले जाते. त्यातील ४० टक्के कॅनिंग, ५० टक्के जिल्ह्य़ाबाहेर विक्री व फक्त १० टक्के विदेशी निर्यात होते असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
आंबा शेतीकडे सरकारने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी संशोधन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन झाल्यास आणखी उत्पादन वाढण्याची शक्यता अनेकांना वाटते.
या संदर्भात देवगड तालुका आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे म्हणाले की, उत्पादक शेतकऱ्यांना दलालांच्या तावडीतून वाचविण्यासाठी २५ वर्षांपूर्वी संस्था स्थापन करून उत्पादकांना मार्केटिंग मिळवून दिले. देशांतर्गत मार्केटिंग व्यवस्था झाल्यास आंबा निर्यात करण्याची गरज नाही. अमेरिका व जपानसारख्या राष्ट्रांत आंबा गेल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. त्यासाठी सरकारी यंत्रणेच्या सकारात्मक नियंत्रणाची गरज विशद केली.
आंबा डझनावर विकला जातो तो प्रति किलो भावाने विकला गेल्यास शेतकऱ्यांना भाव मिळेल. निर्यातीसाठी सरकारने पायाभूत सुविधा देण्याची गरज अ‍ॅड. अजित गोगटे यांनी व्यक्त केली. देवगड तालुका आंबा उत्पादक संस्था ऑनलाइन आंबा विकत आहे. तसेच मार्केटिंग व्यवस्थापनही करत आहे. देवगड मँगो बेबी देण्याची सोय करण्यात येत आहे, असे अ‍ॅड. गोगटे म्हणाले.