मनीष भंगाळे यांचा आरोप
महसूल मंत्री एकनाथ खडसे ही राजकीय व्यक्ती असल्यामुळेच त्यांच्याविरूध्द दाऊद फोन प्रकरणी कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यांच्या ठिकाणी आपण असतो तर लगेच आपल्यावर कारवाई झाली असती, असा आरोप हॅकर मनीष भंगाळे यांनी येथे शुक्रवारी केला.
जिल्हा पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत भंगाळे यांनी खडसे यांना स्वच्छ ठरविण्यासाठी पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी कोणतीही तक्रार नसताना संबंधित कंपनीकडून फोनसंदर्भातील सर्व माहिती कशी मागवली, असा प्रश्न उपस्थित केला. मुंबई पोलीस आणि एटीएस यांना दोन वेळा पुरावे देऊनही त्यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे तपास यंत्रणेवर आपला विश्वास नसल्यानेच न्यायालयात धाव घेतली. दाऊद फोन प्रकरणी आपण पंतप्रधान कार्यालयाशीही संपर्क साधला. परंतु उपयोग झाला नाही. आपणास आणि कुटुंबास पोलीस संरक्षण मिळावे यासाठी सहा जूनला याचिका करणार आहे, असे भंगाळे यांनी नमूद केले.