नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज (गुरुवारी) सहभागी होणार असतानाच संघाचे सर सहकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी प्रणव मुखर्जींचे स्वागत केले. ‘दौऱ्याला इतका विरोध होत असतानाही तुम्ही नागपूरमध्ये आलात. तुमचे नागपूरमध्ये स्वागत आहे’ अशा शब्दामध्ये मनमोहन वैद्य यांनी प्रणव मुखर्जींचे स्वागत केले आहे.

प्रणव मुखर्जी आज संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणार असून संघाचे निमंत्रण स्वीकारल्याने त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. आज संध्याकाळी रेशीमबाग मैदानात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाच्या समारोपाला ते उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनमोहन वैद्य यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक लेख लिहीला असून यात त्यांनी संघ आणि अन्य विचारधारांमधील फरक निदर्शनास आणून दिला.

‘प्रणव मुखर्जी गेल्या कित्येक दशकांपासून राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. यामुळेच त्यांना संघाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले. सामाजिक आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे विचार ऐकण्याची संधी स्वयंसेवकाना मिळणार आहे. तसेच मुखर्जींना देखील थेट संघातील कार्यपद्धतीचा अनुभव घेता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतातील संवाद प्रक्रियेत विचार आणि दृष्टीकोनाची देवाण- घेवाण केली जाते. मग या वैचारिक देवाण-घेवाणीला असा विरोध का केला जात आहे, असा प्रश्न त्यांनी टीकाकारांना विचारला. भारतात डाव्या साम्यवादी विचारांचा प्रभाव असलेला एक वर्ग असून तुम्ही जर डाव्या विचारांशी सहमत नसाल तर तुम्ही उजव्या विचारधारेचे आहात, असा एक समज असल्याचे त्यांनी नमूद केले.

काही वर्षांपूर्वी अभय बंग यांना देखील संघाच्या एका कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले. त्यावेळीही अभय बंग यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली. पण बंग त्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. संघ आणि माझे विचार परस्परविरोधी आहेत. पण तरीदेखील त्यांनी मला आमंत्रित केले. मी याचे कौतुकच करतो, असे बंग यांनी म्हटल्याचे वैद्य सांगतात.

चौथे सरसंघचालक राजू भय्या यांची काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधील एका मोठ्या नेत्याशी चांगली मैत्री होती. उत्तर प्रदेशमधील एका दौऱ्यात राजूभय्या यांनी त्या नेत्याला आमंत्रण दिले. पण त्या नेत्याने कार्यक्रमात येऊ शकणार नाही, असा निरोप पाठवला. मी उपस्थित राहिलो तर पक्षात विनाकारण माझ्यावर टीका केली जाईल, असे त्या नेत्याने म्हटले होते. यावर राजू भय्या यांनी म्हटले होते, की मी जर उद्या एखाद्या काँग्रेस नेत्यासोबत दिसलो तर स्वयंसेवक त्याचा चुकीचा अर्थ घेणार नाही. याऊलट मी त्या व्यक्तीला संघाबाबत माहिती देत असेन, असं स्वयंसेवकाना वाटेल. इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. एका ज्येष्ठ नेत्यावर कनिष्ठ नेते टीका करत आहेत. पण यानंतरही प्रणवदा या नागपूरात आले. त्यांचे स्वागतच केले पाहिजे, असे वैद्य यांनी या लेखाच्या शेवटी म्हटले आहे.