आरेमधील मेट्रो कारशेडसाठी सात जागांचा पर्याय दिलेला असतानादेखील आरेतील दोन हजारांहून अधिक झाडे तोडण्याचा पर्याय मंजूर झाल्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईकरांसह अनेक समाजिक संस्था ‘आरे वाचवा’ मोहिमेत सहभागी झाले आहेत. या मोहिमेला आता कलाविश्वातूनही पाठिंबा मिळत असून अभिनेत्री दिया मर्झानंतर अभिनेता मनोज वायपेयीनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आरे वाचवा’ मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

“मुंबईमध्ये आरे जंगल, गुरुग्राममध्ये अरावली, बुलेट ट्रेन प्रोजेक्ट…विकासाच्या नावाखाली जंगल नष्ट करण्याचे अनेक वाईट परिणाम होणार आहेत. आता वेळ आली आहे आपण उत्तर देण्याची. तुम्ही साऱ्यांनी २० ते २७ सप्टेंबर या काळामध्ये आपआपल्या शहरांमध्ये होणाऱ्या ग्लोबल क्लायमेट स्ट्राइक इंडियामध्ये सहभागी व्हा”, असं नागरिकांना आवाहन करत मनोजने आरे वाचविण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.


दरम्यान, एककीकडे मनोज वायपेयी, दिया मिर्झा ही कलाकार मंडळी आरे वाचविण्यासाठी पाठिंबा देत आहेत. तर दुसरीकडे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार ही कलाकारमंडळी मेट्रोच्या सेवेवर कौतुक सुमने उधळत आहेत.