अन्य गुन्हे मागे घेण्याबाबत विचार

जिल्ह्य़ात मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या जिल्हा बंद आंदोलनात पोलिसांवर हल्ले झालेले गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याबाबत शासन विचार करेल असे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्गला आश्वासन दिले.

मराठा क्रांती मोर्चाने जिल्हय़ात दि. २६ जुलला बंद आंदोलन केले. त्या वेळी मोठय़ा प्रमाणात नुकसानी झालेली नाही, परंतु एका प्रकरणात पोलिसांवर हल्ले झालेले आहेत, हल्ले झालेले प्रकरण वगळता अन्य गुन्हे मागे घेण्यासाठी निश्चितच विचार केला जाईल असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.

न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले असे गुन्हे मागे घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे, मात्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही असे गुन्हे मागे घेण्याबद्दल शासन निर्णय घेईल असे या शिष्टमंडळाशी बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक अँड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडीत शिष्टमंडळाने भेट घेतली.

या वेळी विक्रांत सावंत, मनोहर येरम, अँड. शाम सावंत, वैभव जाधव, प्रकाश परब, सीताराम गावडे, भाऊसाहेब महाडेश्वर, वैभव राऊळ, अनिल परब, संग्राम सावंत, रत्नाकर जोशी, शैलेश घोगळे, ज्ञानेश्वर आळवे, धनंजय पाताडे, देवानंद काळप, बंडय़ा सावंत, सचिन कोंडसकर, शैलेश काळप, तुळशीदास ठाकूर, चंद्रकांत सावंत, उमेश धुरी, युवराज ठाकूर, दिलीप परब, सतीश बागवे, रायबा सावंत व मान्यवर उपस्थित होते.

मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिली आणि हा बंद शांततेत पार पडला जिल्ह्य़ात कोणत्याही प्रकारची नुकसानी झालेली नाही. ओसरगाव येथील एक प्रकरण वगळता जिल्ह्य़ात शांततेत  २६ जुलचे बंद आंदोलन पार पडले असताना कुडाळ, मालवण, देवगड, विजयदुर्ग, दोडामार्ग पोलीस ठाण्यात रस्ता अडवल्याबाबत केस दाखल केल्या आहेत. सदरचे सर्व गुन्हे हे जामीनपात्र स्वरूपाचे आहेत. जिल्ह्य़ात सुमारे तीनशे ते साडेतीनशे निरपराध मराठा आंदोलकांवर पोलिसांनी निरनिराळ्या प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत. स्वातंत्र्य चळवळीसुद्धा इतक्या मोठय़ा प्रमाणावर आंदोलकांवर पोलीस कारवाई झाली नव्हती, मग मराठा आंदोलकांवर अशी दडपशाही कारवाई कशासाठी करण्यात आली असा प्रश्न अ‍ॅड. सुहास सावंत यांनी उपस्थित केला.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे विशेष बाब म्हणून क्रिमिनल कोड कलम  ३२१प्रमाणे काढून घेण्यात यावेत अशी मागणी या वेळी करण्यात आली. ओसरगाव येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांवर हल्ले केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. त्यामागील पाश्र्वभूमी जाणून घ्यावी असे सुहास सावंत यांनी पालकमंत्री केसरकर यांना सांगितले. पोलीस कर्मचारी श्री. कोयंडे यांनी मराठा आंदोलकांना केलेली जातिवाचक शिवीगाळ प्रकरणातून अशांतता निर्माण झाली. त्यामुळे तणाव झाला. पोलीस प्रशासनाने पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केलेली नाही, मात्र आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाची पालकमंत्री व गृहराज्यमंत्री या नात्याने आपण चौकशी करावी अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३०७ चुकीच्या पद्धतीने लावले आहे. जखमी पोलीस कर्मचारी कोणत्या रुग्णालयात उपचार घेत होते आणि आंदोलनादिवशी ते येथे आले त्याबाबत आपल्याला माहिती मिळू शकते. त्यांची जखम गंभीर स्वरूपाची असती तर डॉक्टरांनी रुग्णालयातून त्यांना सोडले नसते याकडेही अ‍ॅड. सुहास सावंत यांनी लक्ष वेधले. या वेळी विक्रांत सावंत यांनी मराठा आंदोलकांवर अन्याय होत असल्याने गुन्हे मागे घ्यावेत  अशी मागणी केली. या वेळी ओसरगाव येथील गुन्हा भादंवि कलम ३०७ लावण्यात आले आहे त्याची सखोल चौकशी करून ते कलम वगळावे अशी मागणीदेखील मराठा समाज क्रांती मोर्चाने या वेळी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री यांच्याकडे केली.

आपण मराठा आंदोलकांवरील गुन्हे दाखल झाले आहेत त्याबाबत माहिती घेऊन पोलिसांवर हल्ले झालेल्या गुन्हय़ाव्यतिरिक्त अन्य गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही केसरकर यांनी दिली. तसेच ३०७ कलम वगळण्याबाबत तपासून योग्य निर्णय घेतला जाईल, असे केसरकर म्हणाले. मराठा समाजाचा कुडाळ, मालवण व सावंतवाडी वसतिगृहांचे निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना सांगितले. तसेच कुडाळ व सावंतवाडी मराठा समाज वसतिगृहाला अनुदान देण्याबाबतही आश्वासन या वेळी दिले.