“राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, जनतेने भाजपा आणि शिवसेना महायुतीला बहुमत दिले असतानाही मुख्यमंत्री कोणाचा होणार, यावरुन दोघांमधील वादामुळे सत्तास्थापन करण्यास विलंब झाला आहे. यामुळे राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. येत्या सहा महिन्यात सत्ता स्थापन करण्यास भाजपा आणि शिवसेना अपयशी ठरले आणि पुन्हा निवडणुकीची वेळ आली तर भाजपा आणि शिवसेनाला  जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही”, असं मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे मुख्य समन्वयक शांताराम कुंजीर म्हणाले.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना शांताराम कुंजीर म्हणाले की, “राज्यात विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपा आणि शिवसेना पक्षाकडून शेतकऱ्याचे प्रश्न, तरुणाच्या हाताला रोजगार यासह अनेक प्रश्न मार्गी लावले जातील अशा अनेक घोषणा केल्याने जनतेने या दोन्ही पक्षांना बहुमत दिले. मात्र, कोणाचा मुख्यमंत्री होणार या वादामुळे मागील 19 दिवसात सत्ता स्थापन करू शकले नाही. यामुळे राष्ट्रपती राजवट करण्याची वेळ आली. या सर्व राजकीय घडामोडी दरम्यान राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्याकडे कोणत्याही राजकीय पक्षांचे लक्ष नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 15 नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. या मागण्याची तरी राज्यपालांनी दखल घेऊन, शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी राज्यात पुन्हा निवडणुकीची वेळ आल्यास भाजपा आणि शिवसेनेला जनता जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असेही सांगितले.