परभणी : मराठवाडय़ात पुढील पाच दिवसांत ढगाळ वातावरण राहणार असून शनिवारी परभणी, बीड, जालना तर रविवारी हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यत तुरळीक पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान खात्याने वर्तविली आहे.

वनामकृविच्या हवामान खात्याने बीड-१०, हिंगोली-१२, जालना-४.०, लातूर-१६.०, नांदेड-१४.०, उस्मानाबाद-९.० तर परभणी जिल्ह्यत ११.० मिमि. पाऊस होईल, असे सांगितले आहे. येत्या ४ मार्चपर्यंत परभणी जिल्ह्यत किमान १५ ते १७ तर कमाल ३१ ते ३२ अंश सेल्सिअस एवढे तापमान राहणार आहे. तसेच वाऱ्याचा वेग साधारणपणे ४ ते ११ किलोमीटर प्रतितास राहील. हवामानातील बदलामुळे दुपारच्या वेळी उष्णता तर सकाळी व रात्रीच्या सुमारास थंडी जाणवत आहे. त्यामुळे अनेकांना खोकला तसेच घसादुखीच्या आजाराने त्रस्त केले असल्याचे दिसून येत आहे.

विद्यापीठाकडून कृषी हवामान सल्ला देण्यात आला असून शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करावी. तसेच परिपक्वतेच्या काळात हरभऱ्याची पाने पिवळी पडून घाटे वाळू लागतात. त्यानंतर पिकाची काढणी करावी अन्यथा पीक जास्त वाळल्यास घाटेगळ होऊन पिकाचे नुकसान होण्याचा इशारा कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.

गहू पिकात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास प्रोपीकोनॅझोल २५ टक्के, ईसी १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून शेतकऱ्यांनी फवारणी करावी. हळद पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळण्यास सुरुवात होताच काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.