‘वर्ष एक, प्रश्न अनेक’ अशी आकर्षक जाहिरात करत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या काँग्रेसच्या मोर्चाला आज चांगला प्रतिसाद मिळाल्याने गेल्या वर्षी फसलेल्या मोर्चामुळे आलेले अपयश आज पुसले गेले.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर या सरकार विरुद्धचे पहिलेच शक्तिप्रदर्शन असल्याने अशोक चव्हाणांनी गेल्या काही दिवसापासून विदर्भात तळ ठोकला होता. कोणत्याही जिल्ह्य़ाला वाहने कमी जाणार नाही, याची जातीने काळजी घेतली होती. गटबाजीचे नंतर बघू, आधी मोर्चाचे काय ते सांगा, असाच सूर चव्हाणांनी प्रत्येक ठिकाणी लावला होता. त्याचा अपेक्षित परिणाम आज उपराजधानीत झालेल्या गर्दीने दिसून आला. आजच्या मोर्चात नेमकी किती उपस्थिती होती, याविषयी वेगवेगळे दावे केले जात असले तरी या मोर्चात कमी गर्दी होईल, हा पोलिसांचाच अंदाज चुकला. त्यामुळे शहरातील वाहतूक दिवसभर ठप्प राहिली. आज चव्हाणांसोबत पृथ्वीराज चव्हाण व नारायण राणे हे दोन्ही माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. गेल्या वर्षी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी युती सरकारला पुरेसा वेळ न देताच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोर्चाचे आयोजन केले होते. त्यात केवळ पाच हजारांची गर्दी जमल्याने काँग्रेसला बरीच टीका सहन करावी लागली होती. या फसलेल्या मोर्चात चव्हाण व राणे सुद्धा सहभागी झाले नव्हते. सत्ताधाऱ्यांनी या अपयशावरून काँग्रेसची बरीच खिल्ली उडवली होती.