मोहोळ तालुक्यातील सारोळे येथील एका गारपीटग्रस्त शेतक-याने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबाचा आधार गेला असताना घरात नातीचा ठरलेला लग्नसोहळा कसा होणार, याची चिंता सतावत असताना अखेर मोहोळ येथील क्षीरसागर बंधूंनी मदतीचा आधार दिला. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या नातीचा विवाहसोहळा निर्विघ्न पार पडला.
सारोळे येथील ज्ञानदेव भागोजी थोरात (वय ६०) या गारपीटग्रस्त शेतक-याने गेल्या मार्चमध्ये आत्महत्या केली होती. त्यामुळे थोरात कुटुंबीयांचा आधार कोसळला होता. त्यांच्या नातीचा विवाहसोहळा अगोदरच ठरला होता. परंतु घरची गरिबी आणि घरच्या कर्त्यां पुरुषाने आत्महत्या केल्यामुळे घरातील विवाहसोहळा कसा करायचा, याची विवंचना थोरात कुटुंबीयांना होती. ही माहिती मोहोळच्या क्षीरसागर कुटुंबीयांना मिळताच त्यांनी माणुसकीच्या भावनेतून तात्काळ थोरात कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मदतीचा आधार दिला. अभिजित क्षीरसागर प्रतिष्ठानने लग्नसोहळय़ाचा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी घेतली. आत्महत्या केलेल्या ज्ञानदेव थोरात यांची नात काजल हिचा विवाह कुरणवाडी (ता. मोहोळ) येथील सोमनाथ मोरे याजबरोबर झाला. सोमनाथचे वडील कांतिलाल मोरे हे वडवळ येथील भाऊसाहेब मोरे यांच्या शेतात सालगडी म्हणून कामास आहेत. भाऊसाहेब मोरे यांनीदेखील आपल्या सालगडय़ाच्या मुलाचा विवाहसोहळा आपल्याच शेतात लावून देत पालकत्वाची जबाबदारी सांभाळली. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय क्षीरसागर यांनी थोरात कुटुंबीयांचे दु:ख मोठे असताना केवळ माणुसकीच्या नात्यातून आपण थोरात यांच्या नातीचे लग्न लावून दिले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.