भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे दहशतवादी कारवाईला थोड्या प्रमाणात आळा बसेल. मात्र, कुटुंबातील व्यक्ती गेल्याची जखम भरुन येणारी नाही, अशी प्रतिक्रिया उरी हल्ल्यातील शहीद जवान संदीप ठोक यांच्या भावाने ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिली. भारतीय लष्कराने केलेली ही कारवाई या अगोदर झाली असती, तर शहीद जवानांना जीवनदान मिळाले असते. अशी भावना ज्ञानेश्वर यांनी व्यक्त केली. दहशतवाद्यांनी लष्कराचे दोन जवान मारले तर त्यांच्या २०० जवानांना कंठस्नान धाडावे, अशी कुटुंबियांची इच्छा असल्याचे ज्ञानेश्वर ठोक यावेळी म्हणाले. भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे पाकिस्तानला काही प्रमाणात दहशत बसेल, असे सांगताना त्यांनी पुढे अशा घटना होऊ नयेत, यासाठी लष्कर आणि भारत सरकारने आणखी कठोर भूमिका घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील उरी लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नाशिकमधील खडांगळीत राहणारे संदीप ठोक यांनी देशासाठी वीरमरण पत्करले. दोन वर्षांपूर्वीच ते सैन्यात भरती झाले होते. शेतकरी कुटुंबातून आलेले ठोक यांना दोन बहिण आणि एक भाऊ आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधी कठोर कारवाई करावी, अशी इच्छा संदीप ठोक यांच्यासह भारतवासियांमध्ये होती. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालय आणि लष्कराच्या नवी दिल्ली येथील संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, भारताने केलेल्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’वरुन आता अनेक क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञ त्यांच्यासोबतच शहीद जवानांच्या कुटुंबियांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत.