गेल्या वर्षी बीड येथील स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रकारामुळे व्यथित होत माळकोळी (तालुका लोहा, जिल्हा नांदेड) येथील जालिंदर रामजी कागणे याने धाडसी निर्णय घेतला, तो विवाहाच्या वेळी घेतलेला हुंडा परत करण्याचा! सासूरवाडीच्या लोकांनी हुंडा परत घेण्यास नकार दिला. पण कागणे यांनी यावर उपाय शोधला व . हुंडय़ात घेतलेले एक लाख रुपये ‘अनाथांची माय’ सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला देण्याचा निश्चय केला. सन १९९९ मध्ये जालिंदर यांचा विवाह अहमदपूर तालुक्यातील थोडगा येथील दिवंगत चंद्रकांत मुंडे यांची कन्या संगीता हिच्याशी झाला. जालिंदर मंदिर शिल्पाचे काम करतात. गावातील दारूबंदीसाठी तुरुंगात जाणारी आई चंद्रकलाबाई व वडील रामजी कागणे यांच्याकडे जालिंदर यांनी हुंडय़ातील एक लाख रुपये परत करण्याचा विषय काढला.
पत्नी संगीताला हुंडा परत करण्याचा निर्धार सांगितला. सासूरवाडीपर्यंत ही चर्चा गेली. सासरे नाहीत. सासू शांताबाई काहीच सांगेनात. हुंडा परत घ्यायचा कसा? आतापर्यंत कोणीच घेतला नाही. लोक काय म्हणतील, याची त्यांना भीती. मेव्हणा गिरीधर मुंडे यानेही बहिणीच्या विवाहात दिलेला हुंडा परत घ्यायला स्पष्ट नकार दिला. जालिंदर यांनी मित्रांसह पसायदान मानव सेवा समिती स्थापन केली आहे. विधायक कामांना प्राधान्य देऊन गावात वेगवेगळे उपक्रम याद्वारे राबविले जातात. जालिंदरने आपल्या मित्रांना हा निर्धार सांगितला. मित्रांनीही या निर्णयाचे स्वागत केले.
लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे गांधी जयंतीदिनी (२ ऑक्टोबर) हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी साहित्यिक अमर हबीब यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला एक लाख रुपयांची देणगी देण्यात येणार आहे.
 ‘आत्मक्लेश’ होऊन हुंडा परत करण्याचा हा अनोखा सोहळा निश्चितच हुंडा घेणाऱ्या-देणाऱ्या व विवाहितेचा छळ करणाऱ्यांसाठी आत्मचिंतन  करायला लावणारा आहे.