राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा निकालाच्या तीन आठवड्यांनंतरही सुटलेला नाही. मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावरून शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा वाढला आहे. शिवसेनेने भाजपची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच भाजपाचे समर्थकही भाजपाची साथ सोडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वाक्यानं सोशल मीडियावर धुमाकुळ घातला होता. त्यानंतर आता मी_भाजप_सोडतोय हा हॅशटॅग सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ट्विटर आणि फेसबुकवर सकाळपासून मी_भाजप_सोडतोय हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराज होऊन आपण भाजप सोडत असल्याच्या प्रतिक्रिया भाजपच्या समर्थकांनी म्हटलं आहे. तर काही जणांनी भाजपाच्या काही दाव्यांची खिल्ली उडवत आपण भाजप सोडत असल्याचं म्हटलं आहे.

तर काही जणांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची ही भाजप राहिली नसल्यामुळे सध्याच्या राजकारणाला कंटाळून भाजप सोडत असल्याचं म्हटलं आहे.