पुर्वीचे सरकार हे आंदोलकांची मते ऐकुन घेत, मात्र सध्या देशात एककेंद्री राजकारण सुरु झाल्याने विकासाची संकल्पाना विकृतीकडे झुकताना दिसत असल्याची टीका नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली.  ठाण्यात विस्थापितांच्या प्रश्नावर आयोजित निवारा परिषदेसंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

रस्तारुंदीकरण, धोकादायक इमारती, प्रकल्पबाधीत यासारख्या असंख्य कारणांनी विस्थापित झालेल्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न आता एैरणी वर आला आहे. एका रात्रीत राहत्या घरातून बेघर होत रेंटल हाऊसींगच्या लहानश्या खोल्यांमध्ये डांबलेल्या कुटुंबाच्या हक्कासाठी  जनआंदोलन ठाण्यात सुरु आहे. येथील ठाणे मतदाता जागरण अभियानाला मेधा पाटकर यांच्या जनआंदोलन राष्ट्रीय समन्वय समितीचा पाठिंबा देण्यासाठी त्या शनिवारी ठाण्यात उपस्थित होत्या. मुंबईच्या विकास कामांमुळे अनेक लोक बेधर झाले, त्यांना आजही राहायला निवारा सरकराने उपलब्ध करुन दिलेला नाही. त्यांचे आयुष्य वाऱ्यावर टाकून झालेला विकास हा विकृत असून सबका साथ, हमारा विकास अशी सरकाची भुमिका स्पष्ट करणारा असल्याची टीका त्यांनी केली.

दुकानदार, कामगार, मोलकरीण यासारखे कामे करणारे विस्थापित हे निम्न मध्यवर्गीयांमध्ये मोडतात, ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हे त्यांच्या घराजवळच असते. त्यामुळे त्यांचे विस्थापन करताना प्रशासन त्यांच्या घरांबरोबर उदरनिर्वाहाचे साधनही हिरावून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. वर्षांनुवर्षे विस्थापित लोकांना कायमाचा निवारा मिळतं नाही. त्यामुळे आज लाखो लोक विकासाच्या नावाखाली रस्त्यावर आले आहेत असा आरोप पाटकर यांनी केला.