|| नीरज राऊत

‘रुग्णसेवा आपल्या दारी’; गर्भवती, स्तनदा माता-बाळांवरील उपचारांना यश:- ‘रुग्णसेवा आपल्या दारी’च्या माध्यमातून जव्हार तालुक्यातील ४६ दुर्गम गावे आणि त्यालगतच्या सुमारे ३०० पाडय़ांवर आठ वर्षांपासून उपचारांना यश आले आहे. या उपक्रमाअंतर्गत आजारपणावर तातडीने औषधोपचार होत आहेत. गर्भवती आणि स्तनदा माता यांच्या आरोग्य आणि पोषण आहारासंदर्भात विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे नवजात बालकांच्या वजनात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात औषधोपचार करून घेण्याबाबत आदिवासी बांधवांची मानसिकता बदलण्यास तसेच महिलांना भेडसावणाऱ्या समस्या डॉक्टरांपुढे मांडण्यास खुले वातावरण निर्माण झाले आहे.

पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरने त्यांचा ग्रामीण आरोग्यसेवा कार्यक्रम ‘सव्‍‌र्ह विथ पॅशन’च्या माध्यमातून सर्वासाठी दर्जेदार आरोग्यसेवा’ देण्यास सुरुवात केली. जव्हार तालुक्यात २०११ मध्ये याला आरंभ झाला. २०१८-१९ या वर्षांत फिरत्या आरोग्य केंद्रात ६५ हजारांहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत.

ग्रामीण भागात ११हून अधिक स्पेशालिटी शिबिरे घेण्यात आली. ही शिबिरे सांधेदुखी, अंगदुखी, श्वसनविकार, त्वचा विकार, गॅस्ट्रोएंटेरायटिस आणि हायपर अ‍ॅसिडिटी/रिफ्लक्ससारखे जठर-आतडय़ाचे विकार तसेच अ‍ॅनिमिया आदींशी निगडित होती. या उपक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या फिरत्या नेत्रउपचार केंद्रामार्फत शालेय विद्यार्थ्यांसह सुमारे पाच हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली.

गर्भधारणेपासून गर्भवती ते स्तनदा मातांसह नवजात बालकांची दर आठवडय़ाला आरोग्य तपासणी केली जात आहे. आवश्यक औषधे देण्यात येत आहेत. त्याचबरोबरीने जोखमी मातांसाठी विशेष औषध उपचार दिले जात आहेत. दर पंधरवडय़ाला या गरोदर व स्तनदा मातांच्या कुटुंबाला प्रथिनयुक्त खाद्य मिळावे यासाठी ७५० ग्रॅम कडधान्य आणि प्रथिनांची भुकटी देण्यात येते. यामुळे बाळाचे वजन वाढण्यास तसेच मातेच्या रक्तातील लोह पातळी वाढण्यास मदत होते, या भागातील नवजात बाळांचे सरासरी वजन २.३ किलो वरून २.८ किलो इतके वाढले आहे. या मातांना बाळंतपणा दरम्यानच्या व्यायामाची तसेच स्तनपान करण्याबाबतची माहिती चर्चासत्रांमधून देण्यात येऊन नवजात शिशूसाठी कपडे, मच्छरदाणी व इतर साहित्य असलेले ‘बेबी किट’ वितरित करण्यात येतात. तालुक्यातील ४६ शाळांमध्ये दर सहा महिन्यांनंतर नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात येते. त्याचप्रमाणे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे याकरिता जलशुद्धीकरण यंत्र पुरवण्यात आले आहेत. विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांच्या शारीरिक बदलासंदर्भात माहिती देऊन पोषण, व्यसनमुक्ती व आरोग्यकारक जीवनशैली याबाबत कार्यशाळा भरवल्या जात आहेत. विद्यर्थ्यांच्या रक्तगटाच्या चाचण्या तसेच मुलांना आवश्यक असलेल्या चपला, ऋतूप्रमाणे कपडे, टॉवेल, साबण अशा मूलभूत बाबी विनामूल्य पुरवण्यात येतात. तालुक्यातील सुमारे तीन हजार विद्यर्थ्यांना दररोज शाळा सुटल्यानंतर बिस्किट देण्यात येत असल्याने शाळांमधील पूर्ण दिवसाची उपस्थिती वाढली आहे.

आरोग्यसेवांचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न  केला आहे. दर आठवडय़ाला तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जात असल्याने रोगाचे तातडीने निदान होऊन त्यावर मोफत औषध उपचार केले जात आहेत.- डॉ. किरण पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी, जव्हार

पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल ‘देण्यासाठी काम करा’ या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करत आहे. आरोग्यसेवा व शिक्षण हे प्रत्येक नागरिकाचे जन्मसिद्ध हक्क आहेत. हे हक्क सर्वाना मिळवून दिले तर समाजात नक्कीच बदल घडून येईल.– श्रीमती उषा रहेजा, विश्वस्त पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल