सांगली : सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील चार मतदार संघातील रणनीती निश्चित करण्यासाठी भाजपची महत्त्वपूर्ण बठक राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये २८ फेब्रुवारी रोजी होत आहे. या बठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत.

मुंबई येथे पक्ष बठकीत दौऱ्याबाबत अंतिम चर्चा झाली असून कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. त्या निमित्ताने भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

भाजपसाठी पश्चिम महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. त्या दृष्टीने मोच्रेबांधणी आणि शक्तिप्रदर्शनासाठी श्री. शहा यांचा २४ जानेवारीला सांगली दौरा निश्चित झाला होता. परंतु त्यांना स्वाइन फ्लू झाल्यामुळे दौरा रद्द करण्यात आला. श्री. शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बठक झाली.

सांगली, कोल्हापूर, सातारा व हातकणंगले  मतदारसंघातील भाजपच्या बूथ कमिटी, केंद्रप्रमुख तसेच आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये श्री. शहा  मार्गदर्शन करतील. कर्नाळ रस्त्यावरील धनंजय गार्डन कार्यालय निश्चित करण्याच्या सूचना आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी चारही मतदारसंघांच्या बूथनिहाय सर्व प्रकारच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

या मेळाव्यासाठी तयारी करण्याच्या सूचना पक्षाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून त्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. राज्यात शिवसेनेशी युती झाली असल्याने सांगली व सातारा हे दोन मतदार संघ भाजपकडे आणि हातकणंगले व कोल्हापूर हे दोन मतदार संघ सेनेकडे आहेत. युतीनंतर निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेऊन पुढील धोरण निश्चित करण्यात येणार आहे..