एजाजहुसेन मुजावर

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जमिनीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर सोलापुरात साधारणत: २८ वर्षांपूर्वी रामजन्मभूमी आंदोलनाच्या आठवणी जाग्या झाल्या. बाबरी मशिदीचा विध्वंस होण्याअगोदर भाजपचे तत्कालीन नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या यात्रेचे सोलापुरातील आगमन व मुक्कामाविषयीच्या आठवणींनाही उजाळा मिळाला. तसेच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सोलापुरात झालेल्या जाहीर सभेत रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित मंदिर शिलान्यासासाठीच्या विटांचेही पूजनही करण्यात आले होते. त्या घटनेलाही ज्येष्ठ शिवसैनिकांकडून उजाळा देण्यात आला.

अयोध्येतील राम मंदिराच्या जागेचा वाद उफाळून आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी हाती घेतलेल्या आंदोलनाला धार चढायला १९८५ नंतर सुरुवात झाली. हे आंदोलन सोलापुरात हळूहळू सुरू झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढत गेली. शिलान्यासासाठी विटा गोळा करण्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल व अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची धार वाढविली असता सोलापुरात अनेक ठिकाणी आंदोलनाचे सत्र सुरू झाले.

पुढे भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना सोबत घेऊन सोमनाथ ते अयोध्या राम रथयात्रा सुरू केली असता ही रथयात्रा सोलापुरात दाखल झाली. सायंकाळी सभेनंतर रात्री कर्नाटकात जाण्यासाठी निघाली. रात्री उमरग्याजवळ मुक्काम करून ही रथयात्रा दुसऱ्या दिवशी सकाळी बीदर जिल्ह्य़ात गेली. त्या वेळी रथयात्रेच्या स्वागतासाठी केल्या गेलेल्या नियोजनाची सूत्रे भाजपचे दिवंगत नेते, माजी खासदार लिंगराज वल्याळ, किशोर देशपांडे, डॉ. इक्बाल रायलीवाला, विश्वनाथ बेंद्रे, रामचंद्र जन्नू, विजय बजाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत कार्यकर्ते बापू सारोळकर, अ‍ॅड. गजानन हंपी,      शांतीलाल जैन आदींकडे होती. त्या संदर्भात बोलताना विश्वनाथ बेंद्रे यांनी अडवाणी यांच्या रथयात्रेत प्रत्यक्ष अडवाणी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याचा अभिमानाने उल्लेख केला. रात्री सोलापुरातून रथयात्रा निघाल्यानंतर हैदराबाद महामार्गावर एका पेट्रोल पंपावर अडवाणी काही वेळ थांबले. तेव्हा तेथूनच त्यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्याबरोबर संवाद साधण्यासाठी दूरध्वनी जोडून देण्याचे काम केल्याची आठवण बेंद्रे यांनी सांगितली.

६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत प्रत्यक्ष बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा त्याचे पडसाद देशभरात उमटले. सोलापुरातही दंगल उसळली. तीन-चार दिवस संचारबंदी लागू होती. तत्पूर्वी, १९९० च्या सुमारास सोलापुरात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा होम मैदानावर झाली, तेव्हा अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी पाठविण्यात येणाऱ्या विटांचे प्रतीकात्मक पूजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यासाठी दिवंगत ज्येष्ठ शिवसैनिक भाऊ जोशी व विजय पुकाळे यांनी पुढाकार घेतला होता. त्या सभेत ठाकरे हे विटांचे पूजन करताना सोबत भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शरद आचार्य, राम भंकाळ उपस्थित होते. त्याची आठवणही शिवसैनिकांनी जागी केली.

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या आठवणी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर जाग्या झाल्या. सोलापुरात १९९० साली दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते जाहीर सभेत राम मंदिराच्या शिलान्यासासाठी पाठविण्यात येणाऱ्या विटांचे प्रतीकात्मक पूजन झाले होते. त्याची आठवण ज्येष्ठ शिवसैनिकांनी जागी केली.