महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग

डहाणू येथील समुद्री कासव शुश्रूषा केंद्रात उपचार करून दोन ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांना समुद्रात सोडण्यात आले. त्यांच्या शरीरात तांदळाच्या दाण्याएवढी मायक्रोचिप बसवण्यात आली आहे.

ही कासवे जखमी अवस्थेत किनाऱ्यावर आढळून आल्याने त्यांना उपचाराकरिता केंद्रात दाखल करण्यात आले होते. समुद्री कासवांच्या शरीरात युनिव्हर्सल मायक्रोचिप बसविण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग आहे. यामुळे भविष्यात मायक्रोचिप बसविलेली कासवे मृत वा जखमी अवस्थेत इतर किनाऱ्यांवर आढळल्यास त्यांची ओळख पटविणे सोपे होणार आहे.

कासव संवर्धन आणि त्यासंबंधी ठोस शास्त्रीय माहिती संकलित करण्याच्या दृष्टीने वन विभागानर  पाऊल उचलले आहे. पावसाळ्यात जखमी आणि अर्धमेली कासवे वादळी लाटांच्या माऱ्यामुळे किनाऱ्यावर येत असतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डहाणू येथे सी-टर्टल ट्रीटमेंट अ‍ॅण्ड ट्रान्झिट सेंटर हे  केंद्र आहे. वन खात्याच्या सहकार्याने ‘वाइल्ड लाइफ कन्झव्‍‌र्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन’ तर्फे या केंद्राचे काम पाहिले जाते.

केंद्रामध्ये उपचार झाल्यानंतर दोन सागरी कासवांना समुद्रामध्ये सोडताना त्यांच्या शरीरात युनिव्हर्सल मायक्रोचिप बसविण्यात आली आहे. ही कासवे भविष्यात इतर राज्यांच्या किनाऱ्याला मृत वा जखमी अवस्थेत आढळल्यास त्याची ओळख पटविणे यामुळे सोपे होणार आहे.   -डॉ. दिनेश विन्हेरकर, डहाणू केंद्राचे पशुवैद्य आणि कासवतज्ज्ञ