संकलन घटल्याने दरवाढ

अशोक तुपे, श्रीरामपूर

दुष्काळ, अतिवृष्टी आणि महापुरामुळे सकस खाद्य न मिळाल्याने गाई व म्हशींची दूध उत्पादन क्षमता कमी झाली आहे. किमान दोन वर्षे तरी ही परिस्थिती कायम राहणार असल्याचे दूध व्यवसायातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे दुधाचे वाढलेले दर खाली येण्याची शक्यता फारच कमी आहे.

अमूल, मदर डेअरी, नंदिनी, महानंद व गोकुळपाठोपाठ सर्वच दूध डेअरीचालकांनी दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. मुंबईत गाई व म्हशीचे दूध पन्नास ते ते साठ रुपये लिटर या दराने विकले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना लिटरमागे केवळ पंचवीस ते तीस रुपये दर मिळत आहे. उत्पादक ते ग्राहक या साखळीमध्ये मध्यस्थांची संख्या वाढली आहे. ती कमी करण्यास सरकारला यश आले नसल्याने शेतकरी व ग्राहक दोघेही भरडले जात आहेत.

दोन वर्षांपूर्वी जागतिक बाजारपेठेत दुधाच्या पावडरचे दर कोसळले होते. देशात पावडरचे साठे पडून होते. दूधही अतिरिक्त झाले होते. त्यामुळे सरकारने दूध निर्यातीला, तसेच दुधाचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून प्रतिलिटर पाच रुपये अनुदानही दिले. मात्र मागील वर्षी दुष्काळ पडला. शेतकऱ्यांना जनावरे छावणीमध्ये ठेवावी लागली. त्या वेळेस ऊस वगळता इतर सकस चारा मिळाला नाही. त्यामुळे गाई, म्हशींची दूध उत्पादन क्षमता कमी झाली. त्यात यंदा देशभर अतिवृष्टी व पूर आले. त्याचाही मोठा फटका बसला आहे. दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी किमान दोन वर्षे लागणार आहेत. त्यामुळे मुंबई, पुण्यासह मोठय़ा शहरातील ग्राहकांना दुधासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

राज्यात १ कोटी ४० लाख लिटर दूधाचे उत्पादन होत होते. त्यात सुमारे तीस लाख लिटरची घट आली आहे. गुजरात, कर्नाटक आदी राज्यांतही उत्पादन घटले आहे. जागतिक बाजारपेठेत दुधाच्या पावडरचे दर तीनशे रुपये किलोवर पोहोचले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत हे दर दोनशे रुपयांच्या आत आहेत. यापूर्वी अतिरिक्त दूध असताना पावडरचे साठे पडून होते. आता दूध उत्पादनात घट आल्यानंतर त्याचा वापर सुरू झाला असून दुधाची मोठी टंचाई त्यामुळे निर्माण झालेली नाही. मात्र गुजरातचे अमूल, दिल्लीची मदर डेअरी व कर्नाटकच्या नंदिनी या दूध डेअऱ्यांनी राज्यात दूध खरेदी सुरू केली आहे. दुधाला जादा पैसे मोजावे लागत असल्याने पिशवीबंद दुधाचे दर सर्वच सहकारी संघ व खासगी कंपन्यांनी वाढविले आहेत.

पशुखाद्य महागले

पशुखाद्याचे दर तीस टक्क्यांनी वाढले आहेत. चाऱ्याच्या किमतीही वाढल्या असून सकस चारा सध्या तरी उपलब्ध नाही. त्यात कोल्हापूर, सांगलीच्या महापुरात गाई मरण पावल्या. महापुरामुळे मोठे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी हा व्यवसाय सोडून दिला आहे. जे व्यवसायात आहेत त्यांना अर्थसाहाय्यही मिळत नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय एका दुष्टचक्रात सापडला आहे.

राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे गोकुळचे दोन लाख लिटर दूध संकलन कमी झाले. राज्यातही सुमारे चाळीस लाख लिटर दुधाचा तुटवडा आहे. पुढील दोन वर्षे ही परिस्थिती राहील. चांगल्या गाई व म्हशींची दूध उत्पादन क्षमता वाढणे, चारानिर्मिती यासाठी वेळ लागेल. पशुखाद्यचे दर वाढले आहेत. शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला तरच उत्पादनात वाढ होईल.

– अरुण नरके, माजी संचालक, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ, नवी दिल्ली

कडवळ, मका, ऊस, वैरण असा सकस चारा महागला आहे. महापुरामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी दुग्ध व्यवसाय सोडत आहेत. टोंड दुधामुळे मुंबईच्या ग्राहकांना पाणीदार दूध विकले जाते. पावडरची भेसळ त्यात होते. अन्न सुरक्षा कायद्यानुसार कारवाई झाली तर दुधाची टंचाई जाणवेल. भेसळीमुळे टंचाई असूनही ती जाणवत नाही.  

– गुलाबराव डेरे, अध्यक्ष, दूध उत्पादक कल्याणकारी संघ, नगर

दुधाचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे. त्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांसाठी पिशवीबंद दूध दरवाढ करावी लागली. मात्र ती फार मोठी नाही.

– दशरथ माने, संचालक, सोनाई दूध