राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तीन जण भाजपात आले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी धसका घेतला असून त्यांनी आणखी मानसिक धक्क्याची तयारी ठेवावी, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या वाटेवर असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

यावेळी त्यांनी बारामतीतील निवडणुकीवरही भाष्य केलं. माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी ज्याप्रमाणे काम केलं आहे. ते बघता त्यांना 2019 त्यांना हरवू असं म्हणणं आशावाद ठरेल. त्यामुळे बारामतीसाठी आमचे लक्ष्य 2024 ची विधानसभा निवडणूक असणार आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून तीन जण भाजपात आल्यानंतर शरद पवार यांनी धसका घेतला आहे. त्यांनी भविष्यात आणखी असे धक्के पचवण्यासाठी तयार राहावे, असेही त्यांनी नमूद केले.

भाजपमधील मेगा भरती लक्षात घेता भाजपा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, ”भाजपाच्या एकट्याच्या ताकदीवरदेखील 200 जागा निवडून येणार्‍या असतील, तरी देखील आम्ही युतीमध्ये लढणार आहोत.” तसेच आगामी मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.