केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे विधान

नांदेड : आम्ही सरकार पाडणार नाही; परंतु  हे तीन पक्षच एकमेकांच्या पायात पाय घालत असून त्यामुळे हे सरकार कधी कोसळेल याचा नेम नाही. भाजप सरकारने केलेल्या कामांना स्थगिती देण्यात हे सरकार धन्यता मानत असून हे महाविकास आघाडी नव्हे तर स्थगिती सरकार आहे. अशा शब्दांत भाजप नेते तथा केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एल्गार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अ‍ॅड. चतन्यबापू देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. बलगाडीतून दानवे यांच्यासह भाजपचे नेते आंदोलनस्थळी आले.

यावेळी दानवे म्हणाले की, अमर, अकबर, अँथोनी या तीनजणांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनविले असून भाजपशी दगाफटका करून शिवसेनेने सरकारमध्ये स्थान मिळविले आहे. अजूनपर्यंत या सरकारने कामाला सुरुवात केली नसून तू मोठा की, मी मोठा.. सरकारवर कोणाची छाप? याच गडबडीत सरकारमधील तीनही पक्ष आहेत. या सरकारने नवीन एकही काम हाती घेतले नसून भाजपने केलेल्या कामांना स्थगिती देण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे.

मराठवाडा वॉटरग्रीड, पोखरा यासारख्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांना तसेच मेट्रो रेलला स्थगिती देण्याचा घाट सरकारकडून घातला जात आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून सरकार महिलांचे संरक्षण करण्यात कमी पडत आहे, असे म्हणत दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली.

भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या की, मुख्यमंत्र्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा म्हणणारे आज सत्तेत असून  शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आता या सत्ताधाऱ्यांवरही ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी दानवे यांनी केली.

आज मुख्यमंत्र्यांची अवस्था रबराच्या बाहुलीसारखी झाली आहे. मित्र पक्षाच्या इशाऱ्यावर या रबरी बाहुलीचा कारभार सुरू आहे. अशा शब्दात दानवे यांनी ठाकरे यांच्यावर तोफ डागली. या आंधळ्या सरकारला वाचा फोडण्यासाठी भाजप रस्त्यावरून आक्रमकपणे यापुढे आंदोलन करणार आहे. या अपयशी सरकारची कानउघाडणी करण्याचे काम भाजप वेळोवेळी करणार असून जनताच सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असे ते यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीची भाजप महिला आघाडीच्या वतीने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या आंदोलनात गंगाधर यशवंत जोशी, बालाजी देशपांडे, डॉ. धनाजीराव देशमुख आदी शेकडो कार्यकत्रे सहभागी झाले होते.

आंदोलनाकडे निष्ठावंतांची पाठ

भाजपच्या अनेक निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे भाजप आमदार मुंबईत आहेत. जिल्हास्तरावर झालेल्या आंदोलनापेक्षा तालुकास्तरावरील आंदोलनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हे विशेष म्हणावे लागेल.