28 September 2020

News Flash

राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा – चंद्रकांत पाटील

मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन पैसा गोळा केल्याचा गंभीर आरोप

संग्रहीत छायाचित्र

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी पंधरा टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच याची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

पाटील म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्याने बदल्या करू नयेत, असा आदेश दिलेला असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामान्य प्रशासन विभागाने बदल्यांवरील स्थगिती उठवली, हे आश्चर्यकारक आहे. राज्य सरकारने करोनामुळे बदल्या रोखल्या होत्या पण नंतर पंधरा टक्के बदल्यांना परवानगी देऊन त्यावरील स्थगिती उठविली. परिणामी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी मलाईदार ठिकाणी बदली करून देण्याचा बाजार मांडला. यामध्ये फार मोठ्या रकमेची उलाढाल झाली. तसेच ज्यांचे राजकीय लागेबांधे नाहीत आणि ज्यांच्याकडे आर्थिक बळ नाही अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर यामध्ये अन्याय झाला आहे. या सर्व प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्याची गरज आहे.”

मुळात करोनाविषयीच्या उपाययोजनात सातत्य राखण्यासाठी चालू आर्थिक वर्षात बदल्या करू नयेत, असे सरकारचे मे महिन्यात धोरण होते. तर जुलै महिन्यात राज्यातील करोनाची साथ अधिक गंभीर झाली असताना एकूण कार्यरत पदांच्या पंधरा टक्के बदल्या करण्याचा आदेश देण्याचे कारणच नव्हते. तसेच नंतर त्याला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचेही कारण नव्हते. राज्य सरकारच्या या धोरणातील गोंधळामुळे करोनाचे संकट असताना मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर करण्याची वेळ आली. करोनामुळे शाळा बंद असताना मुलांसाठी नव्या ठिकाणी शाळेत प्रवेश मिळविण्याचे आव्हानही निर्माण झाले. तसेच करोनाची साथ रोखण्याच्या प्रयत्नांमध्येही अडथळा आला, असे याबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले.

करोनाच्या महासाथीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्य सरकारच्या अर्थ विभागाने ४ मे रोजी एक शासन निर्णय घोषीत केला आणि त्याअंतर्गत अनेक निर्बंध लादले. यामध्ये म्हटले होते की, चालू आर्थिक वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांची बदली करू नये, याविषयीचा आदेश सामान्य प्रशासन विभागामार्फत देण्यात येईल. करोनाच्या अनुषंगाने विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य राहणे आवश्यक आहे, असे कारण बदल्यांवर बंदी घालण्यामागे देण्यात आले होते. दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने अर्थ विभागाच्या ४ मे रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने ७ जुलै रोजी आदेश काढला व ३१ जुलैपर्यंत पंधरा टक्के बदल्या कराव्यात असे स्पष्ट केले. तसेच नंतर २३ जुलै रोजी आणखी एक आदेश काढून बदल्यांची मुदत १० ऑगस्ट केली. हा बदल्यांच्या धोरणातील विलंब आणि गोंधळ असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 4:41 pm

Web Title: ministers in the state huge earnings from the transfer of officials should investigate from cid says chandrakant patil aau 85
Next Stories
1 बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी
2 “पवार साहेब, पार्थवर इतका राग CBI चौकशीच्या मागणीचा की राम मंदिराचे समर्थन केल्याचा?”
3 “कुटुंबात कलह कशासाठी….”, शरद पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
Just Now!
X