जळगावात अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. करोनामुळे लॉकडाउन असून ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा असतानाही ही हत्या झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून खळबळ माजली आहे. डांभुर्णी येथे ३ मार्च रोजी ही हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. मुलगा घरातून बेपत्ता झाला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी एका शेतात मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हा मुलगा २ एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झाला होता. यानंतर कुटुंबाने त्याचा शोध सुरु केला होता. दुसऱ्या दिवशी एका शेतात मुलाचा मृतदेह आढळला. अत्यंत निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये मारेकऱ्यांनी काड्या खुपसल्या होत्या. तसंच डोक्यात विटेने वार करण्यात आले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलाची इतकी निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने हत्येचं नेमकं कारण काय असावं याबाबत पोलीस तपास करत आहेत. दरम्यान मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.