X

औरंगाबादेत ‘व्हाईटनर’ नशा करणाऱ्यांची संख्या हजारांवर

अल्पवयीन मुले आहारी

अल्पवयीन मुले आहारी

सीमा (नाव बदललेले आहे) आपल्या चार मुलांना घेऊन बुधवारी पोलीस आयुक्तालयात आली होती. मुले १२ वर्षांच्या आतील. त्या चारपकी दोन मोठी मुले कसलीतरी नशा करतात, ही तिची तक्रार. सलील (नाव बदलेले) तिचा मोठा मुलगा. चेहरा पूर्णपणे आक्रसलेला. सारखी चलबिचल. हा सलील व्हाईटनरची नशा करण्यात गुरफटलेला. त्याचा लहान भाऊ साडेसात वर्षांचा. अलीकडेच तोही नशा करू लागलाय. नशेच्या आहारी जाऊन होणारी कोवळी पानगळ पाहून पोलिसांनाही धक्काच बसला.

औरंगाबाद शहरात नशेच्या आहारी गेलेली अशी एक हजार मुले असल्याचा अंदाज पोलिसांच्या विशेष शाखेने वर्तवला आहे. दोन आठवडय़ात पन्नास ते साठ मुलांना ताब्यात घेऊन त्यांचे समुपदेशन केल्याची माहिती विशेष शाखेने दिली. विशेष शाखेच्या रेश्मा सौदागर, उपनिरीक्षक गोरख चव्हाण, उदार, बी. डी. मिच्छद्र चव्हाण आदींवर आता अशा व्यसनात गुरफटलेल्या मुलांची शोध मोहीम सोपविण्यात आली आहे.

उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरातील रेल्वे स्टेशन, मुकुंदवाडी, टीव्ही सेंटर आदी जवळपास सर्वच भागात असणाऱ्या झोपडपट्टीतील बहुतांश मुले ही नशेच्या आहारी गेल्याचे आढळून आले आहे. व्हाईटनर, स्टिकफास्ट एका रुमाल किंवा कपडय़ावर टाकायचे आणि त्याला हुंगत बसायचे. दोन-तीन तास माणूस गुंग होतो. दहा ते पंधरा रुपयांत ही नशा करायला मिळते.

सलीलची आई सीमा सांगत होती की, वडील फलक बनवण्याच्या कामासाठी बाहेर पडतात आणि मी दुसऱ्यांच्या घरची भांडी घासण्यासाठी. घरात मुले काय करतात, याची माहिती  नव्हती. मात्र अलीकडे सलीलने शाळाही सोडली. त्याची वाढ खुंटली, वागण्यात बराच फरक जाणवू लागला. एक रुमाल घेऊन तो काहीतरी हुंगत असल्याचे दिसले. त्याला बरेच समजावले, पण ऐकत नव्हता. काल मुलांना पोलिसांनी पकडले म्हणून आज पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांना भेटायला आले. उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांनी यापूर्वी पकडलेल्या मुलांबाबत नोंदवलेल्या निरीक्षणात समोर आलेली बाब सांगितली. अशी नशेच्या आहारी गेलेली मुले पोलिसांशीच मोठय़ा आवाजात बोलतात. आम्ही काय केले, चोरी थोडीच केली आहे, अशी त्यांची भाषा असते.  विशेष म्हणजे दारूतील अल्कोहलसारखे वैद्यकीय तपासणीत याबाबतीत काहीच आढळून येत नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

दोन आठवडय़ांपूर्वी वाळूजमध्ये नबी नावाच्या तरुणाकडे नायट्रेशनसारख्या नशेच्या गोळ्यांचा मोठा साठा सापडला होता. नायट्रेशनची एक गोळी घेतली तर दीड दिवस माणूस गुंगीत असतो. मात्र, नबी हा दिवसभरात १२ ते १४ गोळ्या घेत होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली. छोटा सलील हा नशेकडे वळण्यामागचे कारणही काही तरुणांनी प्रथम त्याला व्हाईटनर, स्टिकफास्ट आणायला पाठवले आणि नंतर त्याला त्यातील नशेची जाणीव करून दिली असे आहे. आता सलील पूर्णपणे नशेच्या आहारी गेला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्राच्या पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काही समुपदेशकांकडून मुलांना समाजावून सांगितले जात आहे.

दुकानदारांना नोटिसा देणार

नशेच्या आहारी गेलेल्या मुलांच्या आईने आज भेट घेतली. मुलांचे व पालकांचे मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशन सुरू केले आहे. अशा मुलांच्या शोधासाठी एक पथकही नियुक्त केले आहे. एखादा लहान मुलगा वारंवार येऊन नशा येणारी रसायन, वस्तू मागत असेल तर दुकानदारांनीही खबरदारी घ्यायला हवी. लवकरच काही दुकानदारांना नोटिसा बजावणार आहोत.    – डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त