विविध अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना लॉकडाऊनमधून सूट मिळावी यासाठी देण्यात आलेल्या भरमसाठ प्रवेशपत्रांमुळे गोंधळ वाढत असल्याचे चित्र आहे. उलट त्यामुळे रस्त्यांवर जास्त गर्दी व्हायला लागल्याने हे सर्व पास जप्त करण्याचा निर्णय वर्धा जिल्हा प्रशासनाने आज (बुधवारी) घेतला.
जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर अत्यावश्यक व अन्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने ठराविक व्यक्तींना प्रवेशपत्र देण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर अन्य ठिकाणी जाण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा प्रवेशपत्रधारकाला पोलिसांकडून सूट मिळत होती. मात्र, काही प्रकरणात त्याचा गैरफायदा होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
चौकाचौकात तैनात असणाऱ्या पोलिसांना चहापाणी देण्यासाठी स्वयंसेवक फिरतात. मात्र, एक लिटरचा थर्मास घेवून ठिकठिकाणी वाटपाचे सोंग करीत असल्याचा फसवा प्रकार उजेडात आला आहे. त्याचबरोबर औषधं घेण्याच्या नावाखाली देखील सर्रासपणे अशी टवाळकी सुरू आहे. त्यामुळे भाजी विक्रेते, पशूपालक, विशिष्ट वाहनचालक, आंतरजिल्हा प्रवास व अन्य स्वरूपात झालेले प्रवेशपत्राचे वाटप संचारबंदीचा फज्जा उडविणारे ठरले आहे. सवलत देण्याचा निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी तहसिल कार्यालयामार्फत झाली. याच कार्यालयाने भरमसाठ प्रवेशपत्र देण्याचा आततायिपणा केल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आले. पोलीस प्रशासनाने यावर बोट ठेवत नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यातील फोलपणा लक्षात आल्यानंतर ज्यांनी अशा जीवनावश्यक सेवांसाठी प्रवेशपत्र देण्यात आले होते, ते रद्द करून जप्त करण्याच्या सूचना पोलीस खात्याला देण्यात आल्या आहेत. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी याला दुजोरा दिला. त्यामुळे आता निवडक व अत्यंत महत्वाच्या कामासाठीच प्रवेशपत्र प्रकरणनिहाय दिल्या जाईल. सर्व सेवा सुरळीत राहण्याची काळजी घेवून प्रवेशपत्राचा विचार होणार असल्याचे ते म्हणाले. तर शहरातील एका पोलिसाने सांगितले की, चौकात तैनात पोलिसांना असा चहापाणी न स्विकारण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे नाहक संपर्क वाढत असल्याचेही दिसून आले आहे.