राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठं नुकसान झालं आहे. महाडमधील तळीये गावात सर्वात मोठी दुर्घटना घडली असून आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये एकूण ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. असं असलं तरी राज्यातील राजकारण काही संपण्याचं नाव घेत नाही. राज्यातील आस्मानी संकटावरून नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच खळबळजनक ट्वीट करून गंभीर आरोपही केला आहे. या ट्वीटमध्ये काळ्या जादूचा संदर्भ देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

“स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी काळी जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो..तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून २८ नोव्हेंबर २०१९ ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल !!”, असं ट्वीट आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.

नितेश राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं की, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सरकारकडून या नागरिकांसाठी खूप उशिराने मदत मिळाली आहे. त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही घटनास्थळी दाखल झालो असता सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं. पुरातून बाहेर काढण्यासाठी बोटी पाठवण्यात आल्या नाहीत. अधिकारी नेटवर्कमध्ये नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्र्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राणे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी तळीये गावाला भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर दुःखाने कोलमडून गेलेल्या ग्रामस्थांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर दिला. राज्यात परिस्थिती उद्भवत असून, जल आराखडा तयार करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.