आमदार रोहित पवार यांना काहीही ज्ञान नसताना ते कर्जत-जामखेडमध्ये करोना या जीवघेण्या महामारीच्या परिस्थितीमध्ये आरोग्य विभागात राजकीय हस्तक्षेप करून अनेक नागरिकांच्या जीविताशी खेळत आहेत, अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथे केली.
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये कोविड सेंटरला माजी मंत्री राम शिंदे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे असलेले रुग्ण, त्यांची असलेली सर्व व्यवस्था, समस्या जाणून घेत पाहणी केली. या वेळी काही रुग्णांची त्यांनी मोठय़ा आस्थेने चौकशी केली तसेच घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे, काहीही अडचण आली तर थेट मला संपर्क करा, असेही सांगताना काळजी घ्या आणि लवकर बरे होऊन बाहेर या असा धीर दिला.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पुंड यांनी त्यांना सेंटरची आणि तालुक्यातील सर्व परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्यासमवेत भाजप किसान आघाडीचे अध्यक्ष सुनील यादव हे उपस्थित होते.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथील तालुका आरोग्य अधिकारी खराडे यांची नगर येथे बदली करण्यात आली. कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामधील काही वैद्यकीय अधिकारी यांना नगर येथे पाठविण्यात आले. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली.
माजी मंत्री राम शिंदे म्हणाले की, करोनाने थैमान घातले असताना काही नेते लोकांच्या जिवाशी खेळत आहेत याचा त्यांना विसर पडला आहे. या ठिकाणी डॉक्टर व प्रशासन यांना काम करू द्यावे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव महत्त्वाचा असतो. मात्र माहिती नसतानाही काहीजण हस्तक्षेप करीत आहेत, ही बाब नक्कीच योग्य नाही. आज तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर करोना चाचण्या होत नाहीत, अशी तक्रार नागरिक करीत आहेत. सध्या या आजारावर लस नसल्यामुळे जास्तीत जास्त चाचण्या करून त्यांच्यावर उपचार करणे हा एकमेव पर्याय आहे.