सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे. आज झालेल्या घडामोडीत सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश कारावा असा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी मांडला.  त्यांनी हा निर्णय घ्यावा यासाठी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देत पक्ष सोडण्याची देखील तयारी दर्शवली. भाजपा प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचाराचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत एकप्रकारे भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले.

सातारा जावळीचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशाबाबत आज सातारा शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थिती बैठक झाली. यात भाजपात प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचारांचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत भाजपा प्रवेशाच्या चर्चेस दुजोरा दिला. सातारा शहरातील समर्थकांचे मत जाणून घेण्यासाठी सुरूची बंगल्यावर त्यांनी बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा बॅंकेचे संचालक प्रकाश बडेकर, प्रकाश गवळी, नासीर शेख, अशोक मोने, अॅड. डी. आय. एस. मुल्ला, रामभाऊ साठे, हेमंत कासार यासह पालिकेतील नगरविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या आमदारकीला दगाफटका होईल यामुळे सध्या शिवेंद्रराजे पक्षावर नाराज आहेत. त्यांनी पक्षाचा उमेदवारी अर्जही भरलेला नाही. बैठकीत सुरवातीला सर्वांनी आपले म्हणणे मांडले, यामध्ये मतदारसंघाच्या हितासाठी आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे वेळ घालवू नका, मतदारसंघाच्या हितासाठी भाजपामध्ये जावे. छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भूमिका अनेकांनी मांडली. यावेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, सातारा-जावळी मतदारसंघातील समाज, मतदारसंघ आणि कार्यकर्त्यांच्या हिताचा निर्णय मी घेणार आहे. कुठेही असलो तरी मला संघर्ष अटळ आहे. लढाई ही करावीच लागणार आहे. लढाईच करायची असेल तर कोठे राहायचे याबाबत समर्थकांचे म्हणणे विचारात घेऊन मी निर्णय घेईन. यावर सर्वांनी तुम्ही भाजपासोबत चला आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगितले. शिवेंद्रसिंह राजेंनी भाजपात प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला याचा सातारा जिल्ह्यात मोठा फटका बसणार आहे. अनेक सत्ता स्थानातून राष्ट्रवादी पक्ष पाय उतार होऊ शकतो. त्यामुळेच शिवेंद्रसिंह राजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडू नये, याकरता राष्ट्रवादी पक्षाचे अनेक बड़े नेते त्यांची मनधरणी करत आहेत. मात्र आमदार शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांच्या मताच्या बाजूने असल्याने त्यांना आता राष्ट्रवादीत रोखणे आवघड झाले आहे.