सात वर्षांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्य़ातील सहआरोपी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी परंडा व उस्मानाबाद न्यायालयांत हजर झाले. दोन्ही न्यायालयांनी एकूण सहा हजार रुपयांचा दंड आकारून व एकूण ४५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला.
परंडा न्यायालयात राज कार्यकर्त्यांसह दाखल झाले. राज यांच्यावर २००८ मध्ये दगडफेक करून सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयात तारखेला हजर न राहिल्यामुळे त्यांना परंडा न्यायालयाने साडेतीन हजारांचा दंड ठोठावला. त्याचबरोबर १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
राज ठाकरे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथील जाधववाडी व सांजारस्ता येथे कार्यकर्त्यांनी एसटी बस फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते. या प्रकरणी उस्मानाबाद पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्य़ात राज ठाकरे यांना सहआरोपी करण्यात आले होते. अनेक वेळा समन्स बजावूनही ते न्यायालयात हजर राहिले नाहीत, म्हणून त्यांच्या विरोधात पकड वॉरंट काढले होते. गुरुवारी दुपारी राज कार्यकर्त्यांसह न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून ठाकरे यांना एका प्रकरणी २ ५०० रुपये दंड आकारून दोन्ही प्रकरणांत ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
न्यायालयाच्या आवारात राज यांना भेटण्यासाठी मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी, तसेच नागरिकांनी गर्दी केली होती. उस्मानाबाद न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर गाडी आत नेण्याच्या कारणावरून मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.