समस्त भारतीयांचे लक्ष लागलेल्या चांद्रयान-२ मोहिमेची यशस्वी सुरुवात झाली आहे. सोमवारी दुपारी दोन वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावले. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले. हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. दरम्यान चांद्रयान २ चं प्रक्षेपण झाल्यानंतर देशभरातून इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.

राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून इस्रोच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “इस्रोने चांद्रयान २ चं यशस्वी प्रक्षेपण करून दाखवलं त्याबद्दल इस्रोतील सर्व शास्त्रज्ञांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनपूर्वक अभिनंदन”.

याआधी १५ जुलै रोजी होणारं चांद्रयान २ चं प्रक्षेपण रद्द करण्यात आलं होतं. हेलियमच्या टाकीतील दबाव कमी झाल्याने हे उड्डाण ५६ मिनिटे आधी रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर इस्रोने आज म्हणजेच सोमवारी दुपारी २.४३ मिनिटांची वेळ चांद्रयान२ मोहिमेची वेळ निश्चित केली.

हा चंद्र जिवाला लावी पिसे! चांद्रयान २ अवकाशात झेपावले
भारताच्या चंद्रावरील ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात – इस्रो प्रमुख

चंद्रापासून ३० किमी अंतर राहिल्यानंतर चांद्रयान २ चा वेग कमी करण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. हे यान चंद्रावर उतरण्याच्या आधीची १५ मिनिटं महत्त्वाची आहेत असं के. शिवन यांनी म्हटलं आहे. भारत सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास तो जगातला चौथा देश ठरणार आहे.

चांद्रयान २ ची वैशिष्ट्ये काय?
– चांद्रयान २ चे वजन ३.८ टन इतके आहे
– भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान २ एक चांगलं उदाहरण ठरणार आहे
– या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न अद्याप कुणीही केलेला नाही