मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस बजावण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी गप्पा मारत असताना त्यांना नोटिसीला कसं उत्तर देणार विचारलं असता राज ठाकरेंनी उलट उत्तर देणार असं म्हटलं. सगळ्या प्रकारची चाचपणी करत आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

नोटीस बजावण्यात आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी राज ठाकरेंना पाठिंबा दर्शवला असून सरकारविरोधी भूमिका घेतल्याने सुडाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला आहे. मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मनसे अशा नोटिसीला भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

२२ तारखेला ठाणे बंदचं आवाहन
नोटीस बजावण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसेकडून २२ तारखेला ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. यासंबंधी बोलताना मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे की, “मुळात हा विषय ईडीचा नसून ईव्हीएमचा आहे. १५ वर्ष ईडीला का नाही कळलं ? राज ठाकरे ज्याप्रकारे ईव्हीएमविरोधात आंदोलन करत आहेत याचा सरकारला त्रास होत आहे. हा सगळा दबावतंत्रांचा भाग आहे”. “जर राज ठाकरेंना खरंच बोलावलं गेलं तर महाराष्ट्रभर किंबहुना मुंबईत जे काही होईल त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल”, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.

अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय-शर्मिला ठाकरे
सरकारचं आमच्यावर खूप प्रेम आहे, त्याचमुळे आम्हाला ईडीची नोटीस आली. अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय आहे असंही शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. सध्या नोकऱ्यांची वानवा आहे, त्यामुळे पुरुषांनाही गृहद्योग करण्याची वेळ आली आहे असाही टोला शर्मिला ठाकरे यांनी लगावला.